वाघाची शिकार झाल्यास माफी नाही - एनटीसीए

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

नागपूर - वाघ संरक्षणावर भर द्या, हवी ती मदत करण्यास राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) तयार आहे. आता वाघाची शिकार झाल्याचे निदर्शनास आल्यास कोणालाच माफी नाही, असा इशारा एनटीसीएचे विशेष महानिरीक्षक स्वाईन यांनी आज येथे झालेल्या बैठकीत दिला.

नागपूर - वाघ संरक्षणावर भर द्या, हवी ती मदत करण्यास राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) तयार आहे. आता वाघाची शिकार झाल्याचे निदर्शनास आल्यास कोणालाच माफी नाही, असा इशारा एनटीसीएचे विशेष महानिरीक्षक स्वाईन यांनी आज येथे झालेल्या बैठकीत दिला.

जिल्ह्यातील खापा वनपरिक्षेत्रात जिवंत विद्युत तार लावून वाघिणीचा मृत्यू आणि पेंच व्याघ्रप्रकल्पातील बफर वनक्षेत्रात वाघिणीचा झालेल्या मृत्यूची गंभीर दखल घेऊन एनटीसीएच्या सूचनेवरून अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक रामबाबू यांनी येथील वनभवनात पूर्व विदर्भातील व्याघ्रप्रकल्पातील अधिकाऱ्यासह इतर विभागांच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. त्यात वाघाची शिकार थांबविण्यासाठी वन कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी रात्रंदिवस गस्त करण्याच्या सूचना दिल्यात. वन्यजीवांच्या संरक्षणावर भर द्या. उन्हाळा तोंडावर आहे. त्यामुळे वाघासह वन्यप्राणी पाण्याच्या शोधात जंगलाच्या बाहेर येऊ शकतात. त्यामुळे जंगलातच पिण्याच्या पाण्याची सोय करणे अपेक्षित आहे. अन्यथा ते गावांत येतील आणि गावकरी सुरक्षेसाठी पाण्यात विष टाकू शकतात. त्यावरही करडी नजर ठेवा. गावकऱ्यांना विश्‍वासात घेऊन शिकारीवर निर्बंध लावा. खापा वनपरिक्षेत्रात जिवंत विद्युत तार सोडून एका वाघिणीची झालेली शिकार अतिशय गंभीर आहे. यापुढे असा प्रकार होऊ नयेत, यासाठी गस्त वाढविण्याच्या सूचना दिल्यात. तृणभक्षी प्राणी शेतातील पिकांचे नुकसान करीत असल्याने त्यांच्या शिकारीसाठी शेतकरी जिवंत विद्युत तारा जंगलाच्या शेजारी टाकतात. त्यात तृणभक्षी प्राणी अडकून मृत्यू पावत असतात. जिवंत विद्युत तारेचा धक्का लागल्यानेच वाघिणीचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे हे मोठे आव्हान आहे. त्यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्यात. वन विभागाकडे अत्याधुनिक यंत्रणा असताना त्याचा वापर आपणाला कसा करता येईल, यावरही चर्चा करण्यात आली. बैठकीला अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक रामबाबू, मुख्य वनसंरक्षक टी. एस. के. रेड्डी, जिल्हा पोलिस अधीक्षकांचे प्रतिनिधी, मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते, डब्ल्यूसीटीचे प्रफुल्ल भांबूरकर, संजय करकरे, मिलिंद परिवक्कम उपस्थित होते.

Web Title: If the victim does not exempt the tiger