कुत्र्याला मारहाण कराल तर सावधान, या कारवाईला जावे लागेल सामोर 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 28 June 2020

गेल्या काही दिवसांपासून मोर्शी शहरात भटक्‍या कुत्र्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शहरातील अनेक भागांत कुत्रे दिसून येतात.

मोर्शी (जि. अमरावती) : भटक्‍या कुत्र्यांमुळे अनेक वाहनचालकांचा अपघात झाला आहे. असे असले तरी भटक्‍या कुत्र्यांना मारहाण करणे, एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. त्याच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

गेल्या काही दिवसांपासून मोर्शी शहरात भटक्‍या कुत्र्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शहरातील अनेक भागांत कुत्रे दिसून येतात. मोकाट जनावरे, डुकरे यामागे ही कुत्री धावतात. त्यातच अनेक भटकी कुत्री वाहनाच्या आडवी येतात किंवा मागे लागतात, या धावणाऱ्या कुत्र्यांमुळे अनेकांचे अपघात झाले व होत आहेत. 

स्थानिक कासारपुरा येथे राहणारे वारसा संस्थेचे सदस्य चेतन प्रमोद लोणकर यांचा कुत्रा बाहेर गेला असता शहरातीलच एका युवकाने त्या कुत्र्याला मारहाण केली. त्यामुळे श्री. लोणकर यांनी त्या युवकाला याबाबत विचारणा केली असता त्यालासुद्धा शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी दिली, अशाप्रकारची तक्रार चेतन लोणकर यांनी मोर्शी पोलिस ठाण्यात दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. 

क्लिक करा - भीषण अपघात : ट्रकने दुचाकीस्वाराला पाचशे मिटर नेले फरफटत; अंगावरचे कपडेही...
 

शहरात मोकाट कुत्रे वाढल्याने नगर परिषद प्रशासनाच्या वतीने भटक्‍या कुत्र्यांकरिता निर्बीजीकरण मोहीम राबवण्यात येते. याकरिता वार्षिक अंदाजपत्रकात स्वतंत्र तरतूद करण्यात येत असते. मात्र, त्यानुसार मोर्शी शहरात कारवाई होताना दिसत नसल्याचे या प्राणीप्रेमींचे म्हणणे आहे. भटक्‍या कुत्र्यांचा बंदोबस्त नगरपरिषद प्रशासनाने करणे गरजेचे आहे. याकरिता नगरपरिषदेच्या वतीने मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण मोहीम राबवावी, अशी मागणी वारसा संस्थेचे अभी व्यवहारे यांनी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If you beat a dog, it will be a crime