पुसदमध्ये एक लाखाचा अवैध दारूसाठा जप्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

पुसद (जि. यवतमाळ) : मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पाळतीवर असलेल्या पोलिस पथकास शनिवारी (ता. 19) पहाटेच्या सुमारास एका वाहनातून अवैधरीत्या दारूची वाहतूक होत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी केलेल्या दोन कारवायांत तिघांना ताब्यात घेतले; तर अन्य दोघांचा पोलिस शोध घेत आहेत. जप्त करण्यात आलेली दारू बनावट असल्याची शंका पोलिसांनी व्यक्‍त केली आहे.

गजानन मंदिराजवळील शैलेश जयस्वाल याच्या घरासमोरून निघालेले वाहन पोलिसांनी पाठलाग करीत हुडी रोडवरील हत्ती पुलाजवळ अडविले. तपासाअंती वाहनात देशीविदेशी दारूचा 1 लाख 11 हजार 600 रुपये किमतीचा साठा, दोन फोन व वाहन असा एकूण 3 लाख 22 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा साठा शैलेश जयस्वाल याने मल्येशाम पल्लेवार (रा. मोतीनगर, पुसद) व अरविंद चव्हाण (रा. फुलवाडी) यांच्या नावे असलेल्या शिवाजी चौकातील देशी दारू दुकानातून घेतल्याचे सांगितले. पोलिस दोघांचा शोध घेत आहेत. तसेच विदेशी दारूसाठा दीपक जयस्वाल (रा. वसंतनगर) याच्या मालकीच्या उमरखेड रोडवरील हरीओम बारमधून घेण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. विदेशी दारू ही बनावट असल्याचा संशय आल्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी बारची झडती घेतली असता या ठिकाणी दारूसाठा आढळून आला. या प्रकरणी शैलेश जयस्वाल, नीतिश शिंदे व दीपक जयस्वाल या तिघांनाही ताब्यात घेण्यात आले. मल्लेश्‍याम पल्लेवार व अरविंद चव्हाण या संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
वडगावातून 43 हजारांचा दारूसाठा जप्त
यवतमाळ : विधानसभा निवडणुकीत तीन दिवस दारू दुकाने बंद राहणार असल्याने महिलेने घरात साठा करून ठेवलेली 43 हजार 592 रुपये किमतीची दारू पोलिसांनी जप्त केली. डी. बी. पथकाने शनिवारी (ता. 19) ही कारवाई केली. मीरा थोरात, असे आरोपी महिलेचे नाव आहे. तिने घरात दारूसाठा करून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांनी छापा टाकून देशी व हातभट्टीची दारू जप्त केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal ammunition seized in Pusad