नद्यांच्या काठावर गाळप; मध्यप्रदेशातून मोहफुलांची आयात, कुठे होतेय अवैध दारूविक्री

Illegal sale of Liquor in Bhandara district, neglected by police
Illegal sale of Liquor in Bhandara district, neglected by police

सिहोरा (जि. भंडारा) : सिहोरा येथे अवैध दारूविक्रीला उधाण आले आहे. या प्रकाराकडे स्थानिक पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, गावात सकाळी व सायंकाळी मद्यपींची जत्रा भरत आहे. या अवैध दारू विक्रीला अभय कुणाचे? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. 

तुमसर तालुक्‍यातील सिहोरा परिसरात सातपुडा पर्वत रांगाच्या घनदाट जंगल आणि वैनगंगा, बावनथडी नद्यांच्या खोऱ्यात आहे. याचा अवैध व्यावसायिक मोठा फायदा घेत आहेत. सिहोरा हे गाव लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे गाव आहे. येथे परिसरातील 47 गावांची मुख्य बाजारपेठ आहे.

याशिवाय शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये, बॅंका, सहकारी पतसंस्था आहेत. त्यामुळे येथे नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. याशिवाय येथे तीन देशी दारू विक्री दुकाने व तीन बिअर बार आहेत. असे असूनही गावात मोठ्या प्रमाणात मोहफुलांची अवैध दारू विक्री होत आहे. गावात डझनभर अवैध मोहफुल दारू विक्रीची दुकाने आहेत. 

हा सर्व प्रकार स्थानिक पोलिस प्रशासनाला माहिती असूनही या अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई होत नाही. कारवाई झाली तर, ती नाममात्र असते. नंतर पुन्हा राजरोसपणे अवैध दारूविक्री केली जाते. या दुकानांमध्ये कुठेही भौतिक अंतराचे पालनही होत नाही. काही दुकाने भरवस्तीत रस्त्यावर आहेत. त्यामुळे संध्याकाळी या दुकानांसमोर जणू मद्यपान करणाऱ्यांची जत्राच भरते.

मोहफुलाच्या दारूमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. भांडण-तंटे निर्माण होऊन कौटुंबिक शांतता भंग होते. काही वर्षांपूर्वी तंटामुक्त गाव समिती आणि महिला व सुज्ञ नागरिकांच्या पुढाकाराने गावात दारूबंदी केली होती. परंतु, त्यात काही विशेष झाले नाही. 

जंगलव्याप्त परिसरात असणारे खंदाळ, दावेझरी, गुढरी व नदी काठावरील सोंड्या, देवसर्रा, सक्करदरा, बपेरा ही गावे मोहफूल दारू गाळप करण्याचे मुख्य केंद्र आहेत. आबकारी विभाग आणि पोलिस विभागाने या अड्ड्यांवर अनेकदा छापा घातला आहे. परंतु, काही दिवसच अवैध दारूविक्री बंद झाली. या परिसरात मोहफुलांची मध्य प्रदेशातून चोरटी वाहतूक केली जाते. बपेरा आंतरराज्य सीमा आणि सोंड्याटोला सिंचन प्रकल्पमार्गे वाहतूक सुरू आहे. यामुळे या परिसरात अवैध व्यवसायाला उधाण आले आहे. या सर्वप्रकाराकडे स्थानिक पोलिस प्रशासनाने लक्ष देऊन अवैध दारू विक्रीला पायबंद घालावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


तंटामुक्त गाव समिती प्रभावहीन 


तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी गावात शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने तथा कौटुंबिक भांडण तंटे यावर उपाय म्हणून प्रत्येक गावात महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची स्थापना केली. याअंतर्गत गावातील तंटे सामंजस्याने सोडवून गावात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम होत होते. मात्र सध्या स्थितीत सिहोरा येथील तंटामुक्त गाव समिती प्रभावहीन झाल्याचे दिसून येते.

अबब, परिसरात 54 अड्डे 

सिहोरा गावात व परिसरात खुलेआम मोहफूल दारू विक्रीचे 54 अड्डे आहेत. ते शैक्षणिक व धार्मिक स्थळांजवळ असल्याने गावातील नागरिकांत नाराजी आहे. पोलिसांच्या आशीर्वादाने दारू विक्रेत्याची मुजोरी वाढली आहे. गावात या दारूमुळे अनेक तरुणांत व्यसन वाढले आहे. परंतु, प्रशासन गंभीर नाही. यामुळे गावात संताप आहे. याशिवाय बपेरा, देवसर्रा, सोंड्या, चुल्हाड बस स्थानक, दावेझरी टोली, खंदाळ, गुडरी या गावात दारूविक्रीचे अड्डे असल्याने तंमुस पदाधिकारी त्रस्त आहेत.

 
धाडसत्र राबविणार
सिहोरा गावातील मोहफुल दारू विक्रेत्यांच्या विरोधात यापूर्वी अनेक वेळा कारवाई केली आहे. त्यांच्या विरोधात प्रतिबंधनात्मक कारवाई केली जाणार असून धाडसत्र राबविण्यात येणार आहे.
-जयसिंग लिल्हारे,  बिट अंमलदार सिहोरा

संपादन : अतुल मांगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com