अधिक महिन्याची पूजा जीवावर बेतली, दोन कुटुंबातील चौघे बुडाले

three children with mother died in Chandrabhaga river
three children with mother died in Chandrabhaga river

धामणगावरेल्वे (जि. अमरावती) : तालुक्‍यातील वाठोडा येथे पोहायला गेलेल्या दोन चिमुकल्यांच्या मृत्यूच्या घटनेला अवघे काही दिवस उलटत नाही तोच तालुक्‍यातील निंभोरा राज येथे एकादशी व अधिक महिन्याच्या निमित्त पूजा करण्यास गेलेल्या झेले आणि चवरे कुटुंबीयांवर काळाने घाला घातला. नदीपात्रात पाय घसरून पडल्याने तीन चिमुकल्यांना जलसमाधी मिळाल्याची, तर त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात मोठ्या आईचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना धामणगाव तालुक्‍यातील निंभोरा राज येथे रविवारी (ता.27) घडली. या घटनेत आणखी दोन महिलांची प्रकृती अत्यवस्थ असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, गावकऱ्यांच्या मदतीने उर्वरित दोन महिलांना वाचविण्यात यश आले आहे.

निंभोरा राज गावाशेजारी वाहणाऱ्या चंद्रभागा नदीच्या पात्रात एकादशी व अधिक मासानिमित्त पूजनासाठी चवरे व झेले कुटुंबीय तसेच इतर महिला गेल्या होत्या. दरम्यान महिलांची पूजा सुरू असताना सोहम दिनेश झेले (वय 10), यश प्रमोद चवरे (वय 11) व जीवन प्रदीप चवरे (वय 15) हे पाय घसरून पाण्यात पडले. शेजारीच असलेल्या खोल पाण्यात चिमुकल्यांना बुडताना पाहून उपस्थित महिलांनी नदीपात्रात वाचविण्यासाठी उड्या टाकल्या, तर काहींनी गावातील लोकांना बोलावून आणले. मात्र महिलांना पोहणे नसल्याने तीनही मुलांचा सदर घटनेत मृत्यू झाला. 

दरम्यान, इतर लोकांना स्थानिकांनी लगेच नदीपात्रातून काढून ग्रामीण रुग्णालयात आणले. दरम्यान पुष्पा दिलीप चवरे (वय 45) या महिलेला पुढील उपचाराकरिता अमरावतीला नेताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी गावातील चौघांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी दत्तापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास ठाणेदार ब्रह्मदेव शेळके यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. नायब तहसीलदार श्री. सयाम, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ तांबे यांनी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन माहिती घेतली.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

निंभोरा राज गावालगत वाहणाऱ्या चंद्रभागा नदीचे जलयुक्त शिवारअंतर्गत तीन मीटर खोलीकरण करण्यात आले होते. संबंधित कामाचे मोजमाप व्हायचे असतानाच वरिष्ठांच्या परवानगीने समृद्धी महामार्गासाठी पुन्हा गौण खनिज उत्खननाकरिता आणखी तीन मीटर खोलीकरणाची परवानगी देण्यात आली. गावाला लागूनच असलेल्या नदीपात्रात सहा मीटर अवाजवी खोलीकरण झाल्यानेच चार जणांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. जोपर्यंत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करीत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतल्याने तणाव वाढला होता. परंतु सदर प्रकरणी रीतसर तक्रार केल्यानंतर चौकशीअंती गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे आश्‍वासन प्रशासनाने दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आले. सायंकाळी निंभोरा राज येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

दोघींना उपचारार्थ अमरावतीला हलविले

चंद्रभागा नदी पात्रात पाण्यात बुडाल्यामुळे राधा गोपाल मलिये (वय 40) व बेबी प्रदीप चवरे (वय 40) यांना रविवारी (ता. 27) दुपारी चार वाजता पुढील उपचारासाठी अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हवलिण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com