विद्यार्थ्यांची चिंता मिटली, एमएचटी-सीईटी परीक्षेला जाण्यासाठी आता विशेष एसटी बसेसची व्यवस्था

मिलिंद उमरे
Sunday, 27 September 2020

1 ते 9 ऑक्‍टोबर या पहिल्या टप्प्यात दोन शिफ्टमध्ये ऑनलाइन स्वरूपात एमएचटी-सीईटी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. उमेदवारांनी विशेष गाड्याच्या वेळापत्रकासाठी तसेच आवश्‍यक माहितीसाठी गडचिरोली येथील एस. टी. महामंडळाच्या कार्यालयात संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

गडचिरोली : जिल्ह्यातील 884 उमेदवारांना एमएचटी-सीईटी 2020 साठी परीक्षा केंद्र नागपूर जिल्ह्यात देण्यात आले आहे. त्यांच्यासाठी प्रशासनाकडून विशेष बसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षेला कसे जायचे? या विवंचनेत असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. 

1 ते 9 ऑक्‍टोबर या पहिल्या टप्प्यात दोन शिफ्टमध्ये ऑनलाइन स्वरूपात एमएचटी-सीईटी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. उमेदवारांनी विशेष गाड्याच्या वेळापत्रकासाठी तसेच आवश्‍यक माहितीसाठी गडचिरोली येथील एस. टी. महामंडळाच्या कार्यालयात संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे. या प्रवासात उमेदवारांनी प्रवास खर्च स्वत: करायचा आहे. तसेच सोबत पालक असल्यास त्यांचाही खर्च स्वत:लाच करावा लागणार आहे. एस.टी. महामंडळाकडून फक्त विशेष बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. 

हेही वाचा - 'संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे'; डॉक्टरांच्या सल्ल्याने खवैय्ये, विक्रेत्यांचं फावलं पण...

उमेदवारांनी या बसेसचा लाभ घेण्यासाठी सोबत परीक्षेचे ऍडमिट कार्ड सादर करणे आवश्‍यक आहे. परीक्षेचा वेळ पहिल्या शिफ्टसाठी सकाळी 9 ते 12 वाजता असून उमेदवारांनी सकाळी 7 वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थिती दाखविणे आवश्‍यक आहे. तसेच दुपारच्या सत्रातील परीक्षा 2.30 ते 5.30 वाजता असणार आहे. दुपारच्या सत्रातील उमेदवारांनी आपली उपस्थिती 12.30 वाजता परीक्षा केंद्रावर दाखविणे आवश्‍यक आहे. जाताना तसेच येताना दोन्ही प्रवासासाठी बसेसची व्यवस्था करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेबाबतची अद्यावत माहिती येत्या कालावधीत जाहीर करण्यात येणार आहे. या प्रवासादरम्यान सर्व उमेदवारांनी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना राबविणे आवश्‍यक आहे, असे आवाहन  प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा - ‘नाफेड'च्या कापूस खरेदीसाठी उद्यापासून नोंदणी,...

विद्यार्थ्यांना झाला आनंद -
विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची परीक्षा असते. पण, यंदा कोरोनामुळे आपल्याला परीक्षा देता येईल की, नाही, या विवंचनेत विद्यार्थी होते. पण, अखेर प्रशासनानेच विशेष बसची व्यवस्था केल्यामुळे संभ्रमात असलेल्या विद्यार्थ्यांचा संभ्रम व चिंता दूर झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रशासनाचे आभार मानत आनंद व्यक्त केला आहे.

संपादन - भाग्यश्री राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: special buses for student from gadchiroli who goes for MHT CET exams