अरेरे! मद्यप्रेमींची पुन्हा पंचाईत; राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतला हा महत्त्वपूर्ण निर्णय

liquor shop seal in washim.jpeg
liquor shop seal in washim.jpeg

वाशीम : कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली. यामध्ये तब्बल दोन महिने मद्यविक्री बंद होती. नुकतीच मद्यविक्री करण्यास शासनाने परवानगी दिली. मात्र, ही परवानगी औटघटकेची ठरली असून वाईनशॉपचे संचालक चढ्याभावाने मद्यविक्री करीत असून मद्यविक्री करताना नियमांचे पालन केले जात नाही, असा ठपका ठेवून आज (ता. 9) सकाळी 11 वाजता रिसोड नाका येथील वाईनशॉप सील करण्यात आले. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने करण्यात आली आहे. त्यामुळे मद्यप्रेमींची पुन्हा पंचाईत झाली आहे.

कोरोना विषाणूने राज्यात प्रवेश करून थैमान माजविले. प्रत्येक जिल्ह्यात कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून येत होते. या महामारीला प्रतिबंधित करण्यासाठी शासनाने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. अत्यावश्यक वस्तूंची तसेच दवाखाने मेडीकल वगळता सर्व प्रकारची खरेदी विक्री बंद करण्यात आली. कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होणार्‍या देशी विदेशी दारू विक्रीची दुकानेही बंद करण्यात आली. त्यामुळे तब्बल दोन महिने मद्यपींच्या घशाला कोरड पडली होती. नाही म्हणायला छुप्या मार्गाने दामदुप्पट भावात मद्याची विक्री होत होती. 

अशी अवैध मद्यविक्री करणार्‍यांवर अनेक ठिकाणी गुन्हेही दाखल झाले आहेत. राज्याची आर्थिक स्थिती मजबुत करण्यासाठी मद्यविक्री सुरू करण्यात यावी, अशी मागणी सोशल मिडीयावरून मोठ्या प्रमाणात होत होती. यामध्ये मोठ-मोठे उद्योजक आणि राजकीय नेत्यांचाही समावेश होता. त्याप्रमाणे चार मे पासून संपूर्ण राज्यात सशर्त मद्यविक्री करण्यास परवानगी देण्यात आली. येथील रिसोड नाका परिसरात असलेल्या वाइन शॉपवरून नियमित मद्यविक्री सुरू झाली. 

मात्र, मद्यविक्री करीत असताना वाईनशॉपचे संचालक हे चढ्याभावाने मद्यविक्री करीत आहेत तसेच याठिकाणी कायद्याचे कोणत्याही प्रकारचे पालन होत नाही, अशा तक्रारी राज्य उत्पादन शुल्क विभागाला प्राप्त झाल्या. या तक्रारींची दखल घेत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी आज (ता. 9) रिसोड नाका परिसरात असलेल्या वाईनशॉपला सील ठोकले. त्यामुळे मद्यखरेदी करण्यासाठी ताटकळत उभ्या असलेल्या अनेक तळीरामांना हातहालवत परत जावे लागले.

परवाना तात्पुरता निलंबित
शहरातील जयस्वाल वाईनशॉप या दुकानावर छापील किंमतीपेक्षा जास्त दराने मद्यविक्री सुरू असल्याची बाब निदर्शनास आली यावरून यादुकानाचा परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आला आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने पुढील कारवाई केली जाईल.
- अतुल कानडे, जिल्हा उत्पादन शुल्क अधिकारी, वाशीम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com