वर्ध्यात वनपरिक्षेत्र कार्यालयाचा प्रताप; लाखोंच्या कामाचे दस्तऐवज गहाळ; माहिती अधिकारातून उघड

दशरथ जाधव
Wednesday, 23 December 2020

सारंगपुरी जलाशयालगतच्या निसर्ग रम्य परिसरात विश्रामगृह, स्वयंपाकगृह, बालउद्यान व सुंदर अशा बांबूच्या झोपड्या तयार करण्याकरिता वनविभागाने सुमारे साठ ते सत्तर लाख रुपयाचा निधी पर्यटन स्थळ विकास योजनेच्या माध्यमातून दिला. मात्र याचा पुरेपूर दुरुपयोग कसा होईल याचीच काळजी घेण्यात आल्याचे झालेल्या कामावरून दिसत आहे.

आर्वी (जि. वर्धा),  : सारंगपुरी जलाशयालगत पर्यटनस्थळ निर्माण करण्याकरिता वनविभागाकडून लाखो रुपये प्राप्त झाले. मात्र, याचा विनियोग कशा प्रकारे करण्यात आला याचे दस्तऐवज येथील वन परिक्षेत्र कार्यालयामधून गहाळ झाली आहेत. माहिती अधिकार अर्जाच्या माध्यमातून ही बाब उजेडात आल्याने आश्‍चर्य व्यक्त केल्या जात आहे. यामुळे येथे भ्रष्टाचार झाल्याची शंका निर्माण होत आहे.

सारंगपुरी जलाशयालगतच्या निसर्ग रम्य परिसरात विश्रामगृह, स्वयंपाकगृह, बालउद्यान व सुंदर अशा बांबूच्या झोपड्या तयार करण्याकरिता वनविभागाने सुमारे साठ ते सत्तर लाख रुपयाचा निधी पर्यटन स्थळ विकास योजनेच्या माध्यमातून दिला. मात्र याचा पुरेपूर दुरुपयोग कसा होईल याचीच काळजी घेण्यात आल्याचे झालेल्या कामावरून दिसत आहे. या संदर्भात येथील माहिती अधिकारात माहिती मागविण्यात आली. येथे तर अजबच प्रकार घडला. येथे झालेल्या कामाची फाईल तयार होती. पण, त्यात दस्तऐवजच नसल्याचे दिसून आले. यामुळे या कामात मोठ्या प्रमाणात अनागोंदी झाल्याचे उघड होत आहे.

हेही  वाचा -प्रेरणादायक : अहेरी नगरपंचायत कर्मचारीच झाले सफाई कामगार; शहराची केली स्वच्छता

सारंगपुरी जलाशय जवळील उंच टेकडीवर विश्रामगृह व पाकगृह बांधण्यात आला. परंतु, तेथे जाण्याकरिता मार्गच तयार केला गेला नाही. विश्रामगृहाची निगा राखण्याकरिता कुणाचीच नियुक्ती नाही. विद्युत रोषणाई, पाण्याची सोय नसल्याने विश्रामगृह भकास झाले. पर्यटकांना निसर्गसृष्टीचा आनंद घेता यावा याकरिता सिमेंट ओटे, बांबूच्या झोपड्या निर्माण केल्या. मात्र, त्याचा दर्जा निकृष्ट असल्यामुळे त्या जमीनदोस्त झाल्या. जलाशयाच्या पायथ्याशी बालउद्यान बांधण्यात आले. त्याची निगा राखण्याकडे दुर्लक्ष झाल्याने येथे काटेरी झुडपे व गवत वाढले. याचा उपयोग एकही बालक घेऊ शकला नसल्याने लागलेला पूर्ण खर्च व्यर्थ गेला.

फाईल आहे कागदं नाहीत 

येथील एका निसर्गप्रेमीनेमाहिती अधिकार अंतर्गत अर्ज दाखल करून याची माहिती मागितली. माहिती उपलब्ध असल्याचे पत्र देऊन दस्तऐवज तपासण्याकरिता बोलावले. त्याच्या समोर कार्यालयातील फाईल काढली मात्र, आतमधील दस्तऐवज गहाळ झाल्याचे उजेडात आले. यामुळे अडचणीत आलेल्या प्रथम माहिती अधिकारी यांनी सुमारे दोन तास बसवून ठेवली शेवटी माहिती कार्यालयात नसल्याचे कबूल करून दस्तऐवज उपलब्ध करून देण्याचे पत्र दिले.

नक्की वाचा - रात्र संचारबंदी सुरू : जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांनाच परवानगी; विनाकारण फिरणाऱ्यांवर...

माहिती देण्यासही टाळाटाळ

वनक्षेत्र अधिकारी एन. एस. जाधव यांनी अर्जदारास माहिती उपलब्ध झाल्याचे सांगितले. कार्यालयातील कर्मचाऱ्यास नियमानुसार रक्कम घेऊन माहिती देण्याचे सांगितले. कर्मचाऱ्याने सहायक वनपरिक्षेत्र अधिकारी कावळे यांच्याकडे माहिती असल्याचे सांगून त्यांच्याकडे पाठविले तर सहायक वनपरिक्षेत्र अधिकारी कावळे यांनी माझ्याकडे माहिती नाही असे सांगून त्यांना परत पाठविले, अशा प्रकारे माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने भ्रष्टाचाराचा संशय बळावत आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Important documents in forest department are missing in wardha district