उपराजधानीवर अरविंद इनामदारांच्या कर्तृत्वाची छाप

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर : राज्याचे माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांची कारकीर्द सतत चर्चेत राहिली. उपराजधानी नागपुरातील पोलिस आयुक्तपदाची ही त्यांची कारकीर्दही चांगलीच गाजली. बाबरी मशीद उद्‌ध्वस्त केल्यानंतर उसळलेली दंगलीदरम्यान त्यांचा खंबीरपणा नागपूरकरांनी अनुभवला. त्यांच्या निधनाचे वृत्त नागपुरात येऊन धडकल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

प्रामाणिक, न्यायप्रिय, कर्तव्यदक्ष, हेल्थकॉन्शीयस, कर्मचाऱ्यांची पाठराखण करणारा खंबीर अधिकारी अशी अरविंद इनामदार यांची पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये ओळख आहे. प्रारंभी नोव्हेंबर 1975 ते ऑगस्ट 1977 दरम्यान गुन्हेशाखेचे उपायुक्त म्हणून यशस्वी जबाबदारी सांभाळली. त्यानंतर ऑक्‍टोबर 1991 मध्ये ते आयुक्त म्हणून उपराजधानीत आले. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद करसेवकांनी उद्‌ध्वस्त केली. खबरदारीच्या उपाययोजना करूनही मोमिनपुऱ्यात दंगल भडकली होती. क्षुब्ध जमावाने पोलिसांवर हल्ला चढविला. इनामदार यांनी "फायरिंग'चे आदेश दिले.

बंदुकीच्या फैरी झडताच सात ते आठजण मृत्युमुखी पडले होते. दुसऱ्याच दिवशी या घटनेच्या निषेधार्थ बडी मशीद परिसरात पुन्हा जमाव एकत्र आला. आयुक्त म्हणून इनामदार स्वत: कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करीत होते. ते उभे असताना घरावरून एकाने इनामदार यांच्यावर मोठा दगड फेकला. चाणाक्ष इनामदार यांनी स्वत:चा बचाव केला. क्षणार्धात पिस्तूल काढून दगड फेकणाऱ्या गॅलरीतील व्यक्तीवर गोळी झाडली आणि तो गॅलरीतून थेट खाली पडला.
एका निवडणुकीदरम्यान दोन सशस्त्र गट एकमेकांवर चालून आले होते. पांडे नावाच्या पोलिस कर्मचाऱ्याने त्यांना लांब ठेवण्याचे बरेच प्रयत्न केले. परंतु, कुणीही ऐकून घेण्याच्या स्थितीत नव्हते. अशात पांडेने अधिकाऱ्याची पूर्व परवानगी नसतानासुद्धा गोळी चालविली. यामुळे कर्मचाऱ्यावर कारवाई होऊन तो सेवेतून बडतर्फ होणार अशी स्थिती होती. पण, इनामदार यांनी कर्मचाऱ्याची कृती परिस्थितीनुसार योग्यच असल्याचे हेरले. कर्मचाऱ्यावर कारवाई टाळून त्यांना बढती आणि रिवॉर्डही दिले. या घटनेनंतर पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये ते कमालीचे लोकप्रिय झाले.

स्मार्ट पोलिस स्टेशन संकल्पना त्यांनीच सर्वप्रथम राबविली. सर्व सुविधायुक्त पोलिस स्टेशन असावे, असा त्यांचा आग्रह होता. पोलिसांची पायी गस्त या संकल्पनेचही ते जनक मानले जातात. पोलिस आरोग्यदृष्ट्या सुदृढ असावे, असा त्यांचा आग्रह होता. स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांना प्रेरित करण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असायचा. त्यासाठी ते विमानतळावरून पोलिस जीमखान्यापर्यंत पायी चालत जायचे. नोव्हेंबर 1994मध्ये नागपूरमधून त्यांची बदली झाली.

कारकिर्दीवर डाग
उन्हाळ्यात नागपुरात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले होते. पोलिस क्वॉर्टरमध्ये पाण्याचा थेंबही पोहोचला नव्हता. अशात रामेश्‍वर मोहड नावाचा पोलिस कर्मचारी वसाहतीत राहणारे अन्य सहकारी व कुटुंबीयांचा मोर्चा घेऊन इनामदार यांच्या कार्यालयात धडकला. इनामदार मोर्चाला सामोरे गेले. वातावरण तापलेलेच होते. संतापाच्या भरात मोहड याने इनामदार यांच्या कानशिलात लगावली होती. पोलिस कर्मचाऱ्याने थेट सीपीवर हात उगारणे ही इतिहासातील पहिलीच घटना होती. या घटनेनंतर मोहडला सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com