बिबट्या आला रे...परिसरात शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण; असा केला हल्ला!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 May 2020

तालुक्‍यातील पान्हेरा येथील शेतकरी मधुकर पंढरी चौधरी यांनी पान्हेरा गावालगत गट नंबर 74 मधील शेतातील वाड्यानजीक सात ते आठ जनावरे बांधलेली होती.

मोताळा (जि.बुलडाणा) : बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार झाल्याची घटना गुरुवारी (ता.14) पहाटे पान्हेरा शिवारात उघडकीस आली. यात संबंधित शेतकऱ्याचे अंदाजे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

तालुक्‍यातील पान्हेरा येथील शेतकरी मधुकर पंढरी चौधरी यांनी पान्हेरा गावालगत गट नंबर 74 मधील शेतातील वाड्यानजीक सात ते आठ जनावरे बांधलेली होती. दरम्यान, बुधवारी रात्रीच्या सुमारास बिबट्याने या पशुधनावर हल्ला करून एका गायीला ठार केले. सुदैवाने इतर पशुधनाला कोणतीही इजा झाली नसल्याची माहिती आहे.

आवश्यक वाचा - अहो आश्चर्यम! वाशीमच्या नवदाम्पत्यांनी वाचविले ९० कोटी

शेतकरी मधुकर चौधरी हे गुरुवारी पहाटे पशुधनाला चारापाणी करण्यासाठी शेतात गेल्यावर सदर प्रकार उघडकीस आला. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. दरम्यान, सरपंच सुनील वैराळकर यांच्यासह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. 

हेही वाचा - संतापजनक : त्याने विवाहितेच्या गळ्यावर ठेवला चाकू अन् मागील खोलीत नेऊन...

सदर गाय जर्सी प्रजातींची असून, तिची किंमत अंदाजे 50 हजार रुपये होती, असे पीडित शेतकऱ्याने सांगितले. सततच्या दुष्काळी परिस्थितीने हतबल झालेल्या शेतकऱ्यावर या घटनेमुळे आर्थिक संकट कोसळले आहे. वन विभागाने संबंधित शेतकऱ्याला शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

महत्त्वाची बातमी - श्रीलंकन राष्ट्राध्यक्षांचा बंगला चक्क महाराष्ट्रात, पहा कसा आहे बंगला

बिबट्याचा धुमाकूळ सुरूच
मागील महिन्यात पान्हेरा शिवारात गोठ्यात बांधलेल्या पशुधनावर बिबट्याने हल्ला करून एका गायीचा फडशा पाडला होता. तर, काही दिवसांनी काबरखेड नजीकच्या दूधमाळ शिवारात शेतात बांधलेल्या वासराला बिबट्याने ठार केले होते. आता पान्हेरा गावालगत बिबट्याने मजल मारून गाईवर निशाणा साधला आहे. त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण असून, बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The incident where a cow was killed in a leopard attack in buldana district