संतापजनक : त्याने विवाहितेच्या गळ्यावर ठेवला चाकू अन् मागील खोलीत नेऊन...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 May 2020

पीडितेचा पती परजिल्ह्यात खाजगी कंपनीत वाहन चालक म्हणून काम करतो. त्यामुळे पतीचे दीड-दोन महिन्यातून घरी येणे-जाणे होते.

मोताळा (जि.बुलडाणा) : चाकूचा धाक दाखवून 25 वर्षीय विवाहितेवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना पिंपळखुटा खुर्द ता. नांदुरा येथे 26 मार्च रोजी घडली. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी गुरुवारी (ता.14) एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.

पोलिस सूत्रांनुसार, नांदुरा तालुक्यातील पिंपळखुटा खुर्द येथील 25 वर्षीय पीडित विवाहितेने बोराखेडी पोलिसांत तक्रार दिली की, पीडिता ही कुटुंबासह गावातील प्लॉटमधील परिसरात वास्तव्यास आहे. तिला पाच वर्षीय मुलगा व तीन वर्षीय मुलगी आहे. पीडितेचा पती परजिल्ह्यात खाजगी कंपनीत वाहन चालक म्हणून काम करतो. त्यामुळे पतीचे दीड-दोन महिन्यातून घरी येणे-जाणे होते. 

आवश्यक वाचा - Video : पालकमंत्री बच्चू कडू यांनी केले चक्क पोलिसांचेच स्टींग ऑपरेशन

26 मार्च रोजी पीडितेचा पती परजिल्ह्यात कामावर होता. दरम्यान, रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास पीडितेची मुले झोपलेली असताना, पीडिता घराचा दरवाजा लोटून टीव्ही पाहत होती. दरम्यान, गावातीलच आरोपी आकाश गोपाल खिरोडकर (वय 30) हा दरवाजा लोटून तिच्या घरात घुसला. त्याने दरवाजाची आतून कडी लावली. तसेच पीडितेचा तोंड दाबला व हातातील चाकू तिच्या गळ्यावर लावून ओरडू नको, मला तुझ्यासोबत शारीरिक संबंध करू दे, अन्यथा तुला व तुझ्या मुलांना जिवाने ठार मारेल, अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपीने पीडितेला मागील खोलीत नेऊन तिच्यावर जबरदस्ती लैंगिक अत्याचार केला. 

हेही वाचा - अबब! शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी लागणार स्टॅम्प, शासन आदेशाविरुद्ध सुरू आहे काम

सदर प्रकार कोणाला सांगू नको असे म्हणून पुन्हा धमकी दिली. या प्रकारामुळे पीडिता भांबावली व भीतीपोटी दुसऱ्या दिवशी माहेरी निघून गेली. तिकडे आई, वडील व मामाला तिने सदर प्रकार सांगितला. त्यांनी पीडितेचा पती घरी आल्यावर सर्व प्रकार सांगून तक्रार करू, असे सांगितले. दरम्यान, 10 मे रोजी पीडितेचा पती घरी आला व पत्नीला फोन करून घरी बोलावले. परजिल्ह्यातून आल्याने पीडितेचा पती होम क्वारंटाईनमध्ये आहे. दरम्यान, पीडिता मंगळवारी (ता.12) सायंकाळी घरी पोहोचली व पतीला सर्व प्रकार सांगितला. 

पतीने तिला धीर दिला व सदर प्रकाराची पोलिसांत तक्रार देण्यास सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी आरोपी आकाश गोपाल खिरोडकर (रा. पिंपळखुटा खुर्द) याच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनात एपीआय राहुल जंजाळ, पोकाँ मंगेश पाटील करीत आहेत.

आरोपीच्या तत्काळ मुसक्या आवळल्या
सदर घृणास्पद प्रकाराची तक्रार दाखल होताच पोलिस निरीक्षक माधवराव गरुड, एपीआय राहुल जंजाळ यांच्या मार्गदर्शनात एएसआय विनोद शिंदे, पोकाँ सुनील थोरात यांनी पिंपळखुटा खुर्द परिसरात धडक देऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या. त्याला गुरुवारी रात्री अटक करण्यात आली असून, शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे समजते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: knife in his hand was placed on the woman's neck in buldana district