नेरला उपसा सिंचन प्रकल्पाचे अपूर्ण काम...पावसाच्या हुलकावणीमुळे नर्सरी करपली

दीपक फुलबांधे
Wednesday, 15 July 2020

वैनगंगेवर बांधलेल्या गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पावर आधारित अनेक उपसा सिंचन प्रकल्पांचे काम करण्यात आले. त्यापैकी नेरला उपसा सिंचन प्रकल्पाचा पसारा सर्वात मोठा आहे. परंतु, प्रकल्पाचे कालवे व वितरिकांची कामे अपूर्ण राहिल्यामुळे शेतात नेरल्याचे पाणी पोहोचवणे कठीण झाले आहे.

भंडारा : जिल्ह्यात सिंचनाच्या सोयीसाठी अनेक वर्षांपासून नेरला उपसा सिंचन प्रकल्पाचे काम सुरू आहे. आता जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांना सिंचनाची आवश्‍यकता आहे. पण, या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची अवस्था "शेतात कालवा पण, पाण्याची वानवा' अशी झाली आहे. त्यामुळे मॉन्सूनचा पाऊस आणखी लांबला; तर या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येण्याची भीती निर्माण झाली आहे.

वैनगंगेवर बांधलेल्या गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पावर आधारित अनेक उपसा सिंचन प्रकल्पांचे काम करण्यात आले. त्यापैकी नेरला उपसा सिंचन प्रकल्पाचा पसारा सर्वात मोठा आहे. भंडारा, लाखनी व लाखांदूर या तीन तालुक्‍यांत या प्रकल्पाचे लाभक्षेत्र पसरले आहे. प्रकल्पाचे कालवे व उपकालव्यांची कामे गेल्या पाच वर्षांपासून करण्यात आली आहेत. मात्र, बऱ्याच ठिकाणी कामे अपूर्णच राहिली आहेत.

चालू वर्षात पावसाळ्याची सुरुवात समाधानकारक होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगबगीने शेतात धान नर्सरी तयार केली आहे. मात्र, पहिले नक्षत्र गेल्यावर पावसाचे दडी मारली. त्यामुळे नर्सरीतील रोपांसाठी सिंचनाची गरज निर्माण झाली. मात्र, वैयक्तिक साधनांशिवाय इतर सिंचनाची साधने कुचकामी ठरली आहेत. नेरला प्रकल्पाच्या कालव्याचे काम लाखनी तालुक्‍यात मचारणापर्यंत झाले. परंतु, त्यानंतर असलेल्या मेंढा, कनेरी, पोहरा, पेंढरी, गडपेंढरी, सेलोटी आदी गावांच्या शिवारात कालव्याचे फक्त खोदकाम झालेले आहे. काही ठिकाणी योग्य मोबदला मिळाला नाही. म्हणून शेतकऱ्यांनी आक्षेप घेतल्याचे सांगण्यात येते. मात्र, यामुळे या सर्व गावातील शेतकरी सिंचनापासून वंचित ठरले आहेत.

शेतकऱ्यांना दुबार पेरणीची भीती

तसेच लाखांदूर तालुक्‍यातील पालेपेंढरी, पाचगाव, सोनगाव, तिरखुरी आदी गावांतील शेतकऱ्यांना सिंचनाचा फायदा मिळू शकला नाही. ऐन पावसाळ्यात पाऊस नवाळा झाल्यामुळे शेतकरी नर्सरीतील रोपे वाचवण्यासाठी धावाधाव करीत आहेत. त्यांना लोकप्रतिनिधी व अधिकारी सहकार्य करीत आहेत. परंतु, प्रकल्पाचे कालवे व वितरिकांची कामे अपूर्ण राहिल्यामुळे शेतात नेरल्याचे पाणी पोहोचवणे कठीण झाले आहे. अशावेळी पावसाला आणखी विलंब झाल्यास या भागातील शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागू शकते. त्यामुळे रोवणीच्या कामांना आणखी महिनाभर उशीर लागू शकतो.

जाणून घ्या : पावसाळा सुरू झालाय... तुम्हाला माहिती आहे का? कोणता पाऊस मानला जातो हानीकारक

आमदार फुकेंनी घेतली दखल

कालव्याचे काम अपूर्ण राहिल्यामुळे शेतापर्यंत प्रकल्पाचे पाणी पोहोचत नाही. त्यामुळे नर्सरीला सिंचनाचा लाभ मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आमदार डॉ. परिणय फुके यांच्याकडे मदतीची मागणी केली. त्यांनी दोन जेसीबी मशीन पाठवून रविवारपासून युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले. मात्र, या जेसीबीसाठी डिझेलची व्यवस्था होत नसल्याने मंगळवारी काम बंद पडले.

हेही वाचा : प्रशासन पडले चिंतेत; भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक

डाव्या कालव्याचे पाणी शेतात

गोसेखुर्द प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले आहे. लाखांदूर तालुक्‍यातील या कालव्याचे काम अपूर्ण राहिले आहे. त्यामुळे टेंभरी व खैरी पट या गावांच्या शिवारात कालव्याचे बॅकवॉटर साचले आहे. त्यामुळे 50 हेक्‍टरच्या जवळपास शेतात कालव्याचे पाणी साचले आहे. यामुळे या शेतातील पिके पाण्याखाली आल्याने कुजण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे जिथे पाहिजे तिथे पाणी मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Incomplete work of Nerla Upsa Irrigation Project