भारत-ऑस्ट्रेलिया "वनडे' महागणार

राजेश प्रायकर
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

भारत-ऑस्ट्रेलिया "वनडे' महागणार
नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत एकदिवसीय सामन्यांच्या तिकीट दरातही वाढ होणार आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना तिकीट दरातून शुल्कवाढीचा भार सहन करावा लागणार आहे. नागपूरच नव्हे तर मुंबई, पुणे, नवी मुंबईतही पोलिस बंदोबस्त शुल्कात पाच ते नऊ लाखांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या गृह विभागाने या वर्षी पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला. राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर व नवी मुंबईत क्रिकेट सामन्यांसाठी संबंधित संस्थांकडून विशेष पोलिस बंदोबस्त मागविण्यात येतो. गृह विभागाने या चारही शहरांत खेळल्या जाणाऱ्या टी-20, एकदिवसीय व कसोटी क्रिकेटसाठी पोलिस बंदोबस्ताच्या शुल्कात पाच ते नऊ लाख रुपयांनी वाढ केली आहे. यात मुंबईसाठी वेगळे शुल्क असून नागपूर, पुणे व नवी मुंबईसाठी वेगळे शुल्क आहेत. नागपुरात मार्चमध्ये एकदिवसीय सामना निश्‍चित आहे. विदर्भ क्रिकेट असोसिएशनला या सामन्यांसाठी 50 लाख रुपये विशेष पोलिस बंदोबस्तासाठी द्यावे लागणार आहे. मागील 2017-18 या वर्षात हे दर 44 लाख रुपये होते. यंदा यात सहा लाखांची भर पडली असून नागपूरकरांना भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यासाठी महागडे तिकीट खरेदी करावे लागणार आहे. पुणे व नवी मुंबईसाठी हेच दर आहेत. टी-20 सामन्यासाठीही हाच दर असून कसोटी सामन्यासाठी यावर्षी 40 लाख रुपये द्यावे लागणार असून यात दीड लाखाने वाढ झाली आहे.
मुंबईत एकदिवसीय सामन्यासाठी 75 लाख रुपये पोलिस बंदोबस्तासाठी चुकवावे लागणार असून मागील वर्षीच्या तुलनेत यात 9 लाखांनी वाढ झाली आहे. टी-20 सामन्यासाठी 70 तर कसोटी सामन्यासाठी 60 रुपये द्यावे लागणार असून यात अनुक्रमे 4 व 5 लाखांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे या दरवाढीनंतर राज्यात केवळ नागपुरात एकदिवसीय सामना आहे.

सामन्यासाठी लागणाऱ्या सर्व खर्चाचा विचार करून तिकीट दर ठरविण्यात येतो. त्यामुळे पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढीमुळे तिकीट दरात किंचित वाढ होईल.
- आनंद जैस्वाल, अध्यक्ष, विदर्भ क्रिकेट असोसिएशन, नागपूर.

Web Title: India-Australia ODIs will be expensive