भारताच्या विकासाची गती संथच - मोहन भागवत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

भविष्य तरुणांच्या हाती
महागाई व बेरोजगारी सामान्य माणसाने वाढवली नसताना त्याचा त्रास सर्वांना होत आहे. आपण सहन करत जगतो आहोत तसेच आपल्या मुलांनाही शिकविण्याची गरज आहे. कारण देश  तरुणांचा असल्याने येत्या ३० वर्षांत या भारताचे भविष्य तरुणांच्या हाती राहील. पुढील पाच वर्षांत त्याची चिन्हे दिसतील, असेही ते म्हणाले.

नागपूर - भारतासह इस्राईल आणि जपानने एकाच वेळी स्वातंत्र्योत्तर प्रवासाला प्रारंभ केला. यातील दोन देशांनी ७० वर्षांत बरीच प्रगती साधून घेतली. मात्र, त्यांच्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या संपन्न असतानाही भारताला हवा तसा विकास साधता आला नाही. भारताच्या विकासाची एकूणच गती संथ असल्याची खंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे व्यक्‍त केली.

प्रहार समाज जागृती संस्थेच्या रौप्यमहोत्सवाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्ष शमा देशपांडे उपस्थित होत्या. यावेळी सरसंघचालकांच्या हस्ते ‘अमृतकण’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. डॉ. भागवत म्हणाले की, इस्राईल १९४८ साली स्वतंत्र झाला. त्यानंतर आठ देशांनी त्यावर आक्रमण केले. तरी या देशाने प्रत्येक संकटावर मात करीत वाळवंटाचे नंदनवन केले. आता इस्राईलचे कृषी विकासाचे मॉडेल जगात सर्वश्रुत असून, त्यांच्याकडे वाकडी नजर करणाऱ्यांचे काय होते हे साऱ्यांना माहीत झाले आहे. जपानचेही असेच आहे. चारही बाजूने समुद्र असतानाही आर्थिक क्षमता निर्माण करून त्यांनी विकास साधला. आज चीनसोबत पंगा घेण्याची त्यांची ताकद आहे. स्वातंत्र्याच्या वेळी भारताच्या तिजोरीत तीस हजार कोटी होते व इंग्लंडकडून १६०० कोटी घेणे बाकी होते तरी आपल्या देशाचा आज हवा तसा विकास बघायला मिळत नाही. 

युद्ध नसताना देशाचे जवान शहीद होण्यापासून थांबवायचे असतील तर आपल्या प्रत्येकाला देशाला मोठे करण्यासाठी परिश्रम घ्यावे लागतील. त्यासाठी प्रत्येकाने प्रहारसारख्या संस्थेला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे यांनी केले.   

भविष्य तरुणांच्या हाती
महागाई व बेरोजगारी सामान्य माणसाने वाढवली नसताना त्याचा त्रास सर्वांना होत आहे. आपण सहन करत जगतो आहोत तसेच आपल्या मुलांनाही शिकविण्याची गरज आहे. कारण देश  तरुणांचा असल्याने येत्या ३० वर्षांत या भारताचे भविष्य तरुणांच्या हाती राहील. पुढील पाच वर्षांत त्याची चिन्हे दिसतील, असेही ते म्हणाले.

Web Title: India growth slow says Mohan Bhagwat