भारताने पाकशी कोणतेही क्रीडासंबंध ठेवू नये - वीरधवल खाडे

Virdhawal-Khade
Virdhawal-Khade

नागपूर - पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी पाकिस्तानच्या खेळाडूंना व्हिसा न देण्याचा घेतलेला निर्णय योग्य असून, सद्यस्थितीत शेजारी राष्ट्राशी भारताने कोणतेही क्रीडासंबंध ठेवू नये, असे मत बीजिंग ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणारा जलतरणपटू वीरधवल खाडेने व्यक्‍त केले. कामठी रोडवरील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये जलतरण तलावाच्या उद्‌घाटनासाठी आला असता तो पत्रकारांशी बोलत होता.

वीरधवल म्हणाला, पाकिस्तान जे काही करीत आहे, ते कोणताच भारतीय खपवून घेऊ शकत नाही. या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या नेमबाजांना व्हिसा न देण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय माझ्या मते योग्यच आहे. या निर्णयानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने भारतीय नेमबाजांचा ऑलिम्पिक कोटा कमी केला असला तरी, खेळापेक्षा देश मोठा आहे हे आम्ही विसरू शकत नाही. खेळाच्या संदर्भात कठोर निर्णय घेण्याची आवश्‍यकता होती. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाचे पूर्णपणे समर्थन करतो.

पुढील वर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकची तयारी करीत असलेला वीरधवल म्हणाला, आशियाई पदकानंतर ऑलिम्पिक पदक मिळवायचे आहे. ते माझे स्वप्नही आहे. पात्रता स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केल्यास नक्‍कीच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकतो. जागतिक स्तरावर असलेली प्रचंड स्पर्धा लक्षात घेता पात्र ठरणे सोपी गोष्ट नाही. पण, त्यासाठी कसून तयारी सुरू आहे. 

येत्या मार्चमध्ये सिंगापूर व त्यानंतर कोरिया येथील दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धांवर सध्या पूर्ण ‘फोकस’ असून, सर्व ताकद झोकून देणार आहे. ऑलिम्पिकमधील भारताच्या जलतरणातील संभाव्य कामगिरीबद्दल तो म्हणाला, सद्यस्थितीत ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळविणे भारतीयांसाठी कठीण असले तरी, श्रीहरी नटराज, अद्वैत पागे व सज्जन प्रकाशसारख्या खेळाडूंमध्ये ती क्षमता आहे. येणाऱ्या स्पर्धांमध्ये ते कशी कामगिरी करतात यावर सर्वकाही अवलंबून राहील.  

सध्या बंगळूरमध्ये निहार अमीन यांच्या मार्गदर्शनात सराव करणाऱ्या वीरधवलने आंतरराष्ट्रीय जलतरणपटूंच्या तुलनेत भारतीय खेळाडू खूप मागे असल्याचे मान्य केले. ‘खेलो इंडिया’विषयी वीरधवल म्हणाला, या महोत्सवामुळे युवा खेळाडूंना चांगले व्यासपीठ मिळाले ही गोष्ट खरी  आहे. परंतु, यात पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना शिष्यवृत्ती देण्याला खूप उशीर केला जातो.  त्यामुळे अपेक्षित साध्य होणार नाही. सरकारने या दृष्टीने गांभीर्याने विचार करण्याची आवश्‍यकता आहे. निवृत्तीनंतर युवा जलतरणपटूंना प्रशिक्षण देणार असल्याची इच्छा त्याने यावेळी बोलून दाखविली.

पालकांकडून मुलांना प्रोत्साहन हवे
वीरधवलने खेळाडू घडविण्यासाठी शालेय स्पर्धा अतिशय महत्त्वाच्या असल्याचे सांगितले.  अनेक विद्यार्थी शालेय स्पर्धांमध्ये खेळतात. परंतु, कॉलेजमध्ये गेल्यावर खेळ सोडून गुणांसाठी शिक्षणावर भर देतात. विशेषत: ग्रामीण भागातील मुले नोकरीच्या उद्देशाने याकडे वळतात. ही परिस्थिती बदलणे गरजेचे आहे. पालक, क्रीडा शिक्षक व प्रशिक्षकांनी मुलांना खेळासाठी  प्रोत्साहन दिले, तर नक्‍कीच चांगले खेळाडू उदयास येऊ शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com