गुप्तधनासाठी सुनेचा अमानवीय छळ

file photo
file photo

चंद्रपूर : लग्नानंतरचा सासरचा पहिलाच दिवस. तिला घरच्यांनी रात्री तीन वाजता उठविले. गावात स्मशानशांतता होती. हातातील हळद सुकण्यापूर्वीच तिला अंगणातील दर्गा पाण्याने धुवायला लावला. त्याच दर्ग्यातील कासवाला अंघोळ घालायला लावली. त्याची हळद, कुंकू, गंध लावून पूजा-अर्चा करायला सांगितले. एक ते दीड किलो मुरमुरे खाऊ घालायला लावले. विधी सुरू असतानाच नवऱ्याच्या अंगात बाबा आला आणि नववधूला त्याने बेदम मारहाण केली. लग्नाच्या पहिल्या दिवसापासून सुरू झालेला तिचा अमानवीय छळ सतत 50 दिवस सुरू होता.
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील मुकेश वाघाडे यांची मुलगी सविता. ती उच्चविद्याविभूषित आहे. चिमूर तालुक्‍यातील सावरी बिडकर येथील समीर गुणवंत कारेकार याच्याशी तिचा 19 ऑगस्ट 2018 रोजी विवाह झाला. सासरी गेली त्याच दिवशी सासू विमलबाई अंगणात घसरून पडल्या. तेव्हापासून सविताच्या माथी सासरच्या लोकांनी "अपशकुनी' असा शिक्का मारला. कारेकर यांच्या अंगणात एक पुरातन दर्गा आहे. पहिल्याच रात्री सविताला तीन वाजता दर्गा स्वच्छ करायला लावला. याच दर्ग्यात एक कासव ठेवले होते. कासवाची अंघोळ आणि त्याचीही पूजा-अर्चा करायला सांगितले. त्यांच्याच सांगण्यावरून कासवाला एक ते दीड किलो मुरमुरे खावू घातले. त्याचवेळी समीरच्या अंगात बाबा आला. तो मारझोड करेल. ते मुकाट्याने सहन करण्याची तंबीही सविताला सासरच्यांनी दिली. दुपारी दोन वाजेपर्यंत तिला पाणी, चहा, अन्न काहीच दिले नाही.
तिची तेथून सुटका होईपर्यंत सतत 50 दिवस रात्री तीन ते दुपारी दोन वाजेपर्यंत हा धक्कादायक प्रकार सुरू होता. अनेकदा गुजगाव येथील अरुण दहीकर विधीत सामील व्हायचा. तो लिंबूला सात काटे टोचून सविताच्या अंगावरून उतरवीत. या काळात तिला मारहाण आणि चटके देणे नित्याचेच झाले होते. या विधीमुळे नागोबा प्रसन्न होऊन गुप्तधन वर येईल, असा समज समीर आणि त्याच्या आईवडिलांचा होता. यापूर्वी समीरचे दोन लग्न झाले आहे, याची माहिती सविताला मिळाली. त्या मुलीही याच अघोरी छळामुळे सोडून गेल्या होत्या. समीरच्या तिसऱ्या लग्नाची माहिती गावकऱ्यांना नव्हती. गुप्तधन शोधण्यासाठी तो लग्न करायचा, असेही अंनिसचे राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे यांनी सांगितले.
वडिलांशी संपर्कच तोडला
या काळात तिला भ्रमणध्वनीपासून वंचित ठेवले. सविताच्या आईचे दोन वर्षांपूर्वीच निधन झाले. तिच्या वडिलांना संपर्कासाठी तिच्या सासूने स्वत:चा भ्रमणध्वनी क्रमांक दिला. ज्यावेळी वडिलांचे भ्रमणध्वनी यायचे तेव्हा सासू सविताच्या बाजूलाच असायची. त्यामुळे घरात काय सुरू आहे, हे तिला सांगता येत नव्हते. परंतु, वडिलांना तिच्या बोलण्यावरून सारं आलबेल नाही, याची जाणीव झाली. त्यामुळे त्यांनी तिच्याकडे एक-दोनदा येण्याचा प्रयत्न केला. परंतु, तुम्हाला विटाळ असल्यामुळे आम्ही मुलगी तुमच्याकडे पाठवू शकत नाही. तुम्ही आमच्याकडे येऊ शकत नाही, असे कारेकार कुटुंबीयांनी सांगितले. 8 ऑक्‍टोबर 2018 रोजी सविताला कारेकर कुटुंबीयांनी जबर मारहाण केली. त्याचदिवशी वडील नवरात्रीला जावई आणि मुलीला गावाला घेऊन जाण्यासाठी आले होते. मात्र, सविताचा अघोरी छळ बघून त्यांनी मुलीलाच कायमचे सोबत नेले. तेव्हापासून त्यांचा न्यायासाठी लढा सुरू आहे. या काळात वनमंत्री, महिला आयोग, जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे अनेक तक्रारी केल्या, असे मुकेश वाघाडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com