भंडारा रुग्णालय आग प्रकरण: चौकशी समितीकडून दिवसभर तपास; अधिकारी-कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविले

दीपक फुलबांधे 
Tuesday, 12 January 2021

शनिवारी पहाटे जिल्हा सामान्य रुग्णालयातील न्यूबॉर्न केअर युनिटमध्ये आग लागली. यात आउट बॉर्नमधील 10 बालकांचा मृत्यू झाला तर, इनबॉर्नमधील सात बाळांना वाचविण्यात यश आले. या घटनेने संपूर्ण राज्यात व देशात खळबळ उडाली.

भंडारा :  येथील जिल्हा रुग्णालयातील अग्नीकांडाची चौकशी करणाऱ्या विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेतील समितीने आज, मंगळवारी दिवसभर तपास केला. यात 10 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचे बयान नोंदविल्याची माहिती असून, सायंकाळपर्यंत तपास सुरू होता.

शनिवारी पहाटे जिल्हा सामान्य रुग्णालयातील न्यूबॉर्न केअर युनिटमध्ये आग लागली. यात आउट बॉर्नमधील 10 बालकांचा मृत्यू झाला तर, इनबॉर्नमधील सात बाळांना वाचविण्यात यश आले. या घटनेने संपूर्ण राज्यात व देशात खळबळ उडाली.त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अनेक मंत्री, वरिष्ठ अधिकारी, तंत्रज्ञांनी भेटी दिल्या. मुख्यमंत्र्यांनी मृत बाळांच्या मातांचे सांत्वन केले. या कुटुंबांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात आली आहे.

नक्की वाचा - घरात लक्ष्मी आली म्हणून बाप वाटत होता पेढे, पण एक फोन आला अन् सर्वच संपलं

दरम्यान, घटनेची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त संजिवकुमार यांच्या अध्यक्षतेत समिती गठित करण्यात आली. आज सकाळी 11 वाजतापासून समिती रुग्णालयात दाखल झाली. तेव्हापासून सायंकाळपर्यंत तांत्रिक विभागाकडून सतत तपास करण्यात आला. तसेच घटनेच्या दिवशी कर्तव्यावर असलेल्या 10 पेक्षा अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांचे बयान नोंदविण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

दिवसभर समितीच्या सदस्यांकडून कसून तपास करण्यात आला. या समितीला तीन दिवसांत अहवाल सादर करावयाचा होता. त्यामुळे समितीकडून आज किंवा उद्या या घटनेबाबत शासनाला अहवाल सादर केला जाण्याची शक्‍यता आहे. मात्र, आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनीसुद्धा आज या रुग्णालयात भेट दिली आहे. त्यांच्यामुळे त्यांच्यामार्फतही चौकशी अहवाल शासनाकडे पाठविला जाऊ शकतो.

दरम्यान, दुपारी मेडिकल कौन्सिलचे उपाध्यक्ष रिंकी रुधवानी व त्यांच्या चमूने जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. यात विदर्भ व मराठवाड्यातील सदस्यांचा समावेश आहे.

अधिक वाचा - झोपेतून उठताच दिसला नाही कर्ता पुरुष; चिठ्ठी सापडताच अंगाचा उडाला थरकाप 
   
राज्यपालांचा आज दौरा

रुग्णालयातील अग्नीकांडात 10 चिमुकल्यांचा करुण अंत झाला. याची दखल उच्च पातळीवरून घेतली जात आहे. यातच बुधवारी सकाळी 10 वाजता महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी या रुग्णालयाला भेट देणार आहेत. या दौऱ्याची माहिती झाल्यापासून प्रशासकीय पातळीवरून सुरक्षा व्यवस्था व इतर बाबतीत बारकाईने लक्ष दिले जात आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inquiry Committee Investigate in Bhandara hospital