१० लाख प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर

१० लाख प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर

नागपूर - वाढता मानवी हस्तक्षेप, हवामान बदल, तापमानवाढ यामुळे पृथ्वीवरील प्राणी  व वनस्पतींच्या सुमारे १० लाख प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, असे इंटरगव्हर्नमेंटल सायन्स-पॉलिसी प्लॅटफॉर्म ऑन बायोडायव्हर्सिटी अँड इकोसिस्टम सर्व्हिसेस (IPBES) च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे.
जैवविविधतेने संपन्न असलेल्या १७ देशांपैकी भारत हा महत्त्वपूर्ण देश आहे. 

जागतिक तुलनेत २.४ टक्के क्षेत्रफळ असणाऱ्या भारतात संपूर्ण देशात आढळणाऱ्या एकूण प्रजातींपैकी ७ ते ८ टक्के प्रजातींची नोंद झाली आहे. त्यात एकूण ४५ हजार वनस्पती आणि ९१ हजार प्राणी प्रजाती आहेत. मात्र, दरवर्षी इंग्लंड देशाच्या आकाराइतके जंगल कापले जाते. त्यामुळे कार्बन डायऑक्‍साइडचे प्रमाण वाढत आहे. ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, रशिया, पोर्तुगाल, कॅलिफोर्निया व ग्रीस या देशात वणवे लागत आहेत. भारतात व महाराष्ट्रतही अशा घटनांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. 

जैवविविधतेचा विचार केल्यास भारतातील पश्‍चिमघाट, हिमालयाचा पूर्व भाग, अंदमान व  निकोबार बेटावरील जैवविविधतेमुळे आपला देश जैवविविधतेबाबत साधनसंपत्तीने समृद्ध आहे. महाराष्ट्रातील पश्‍चिम घाट आणि ७२८ किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा यांचा यामध्ये मोठा वाटा आहे. ही संपन्न असलेली जैवविविधता आणि प्राचीन काळापासून मानवी जीवनाशी निगडित आहे. आपल्या देशातील पारंपरिक ज्ञान, वनस्पती आणि प्राण्यांवर परदेशातही मोठ्या प्रमाणावर संशोधन केले जाते.

वनस्पती व प्राण्यांच्या संख्येवर परिसंस्थेचे आरोग्य अवलंबून असते. जेव्हा एखादी प्रजाती लुप्त होताना दिसते तेव्हा निश्‍चितच पर्यावरणाची हानी होत असल्याचे दिसून येते. एखादी प्रजाती लुप्त झाली तर त्याचा परिणाम इतर प्रजातींवरही होत असतो. पर्यावरण शुद्ध ठेवण्यासाठी निरोगी परिसंस्था असणे आवश्‍यक आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरत असलेल्या औषधांची उत्पत्ती वनस्पतींपासून झाली आहे. उपलब्ध वनस्पतींपैकी फारच थोड्या वनस्पतींच्या प्रजाती  औषधी उपयोगासाठी वापरल्या गेल्या आहेत. हजारो प्रजातींचे आजूनपावेतो संशोधन होणे बाकी आहे. एखादी प्रजाती ओळख होण्यापूर्वीच लुप्त झाली तर मानवाचे फार मोठे नुकसान होऊ  शकते. यामुळे सर्व प्रजातींचे संरक्षण आणि संवर्धन करणे आवश्‍यक आहे.

असा साजरा होतो जैविक विविधतादिन
आपल्या सभोवताल आढळणाऱ्या सजीवांचे अनेकविध प्रकाराला जीवशास्त्रीयदृष्ट्या जैविक विविधता म्हणतात. जैविक संसाधनाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी जनतेमध्ये जनजागृती  करणे आवश्‍यक आहे. यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेने (युनो) २२ मे २००० पासून आंतरराष्ट्रीय जैवविविधतादिन साजरा करण्याचे घोषित केले. तेव्हापासून २२ मे रोजी जगभरात विविध  उपक्रम, वेगवेगळ्या संकल्पना राबवून हा दिवस साजरा करण्यात येतो. लोकसहभाग आणि जनजागृतीद्वारे वनस्पती आणि प्राण्यांचे संरक्षण व संवर्धनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.

तयारी संरक्षण आणि संवर्धनाची
प्राण्यांच्या अधिवासामध्ये मानवी हस्तक्षेप व वनस्पतींच्या अवाजवी वापरामुळे आणि तापमान वाढीमुळे प्राणी-वनस्पतींची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण १४९ वनस्पती आणि १८ प्राणी प्रजातींचा दुर्मीळ, लुप्तप्राय व धोकाग्रस्त यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. याचा सामना करण्यासाठी देश आणि राज्य पातळीवर याविषयी  जैवविविधता मंडळ स्थापन करण्यात आली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ (आयसीयुएन) ही संस्था अनेक वर्षांपासून जागतिक पातळीवर प्रजाती, उपप्रजाती व त्यांचे प्रकार याविषयी संरक्षण आणि संवर्धनाचे कार्य करीत आहे.

मानवाचे निसर्गाकडे होत असलेले दुर्लक्ष, हवामान बदल, तापमान वाढ आदी कारणांमुळे जैवविविधतेला धोका उत्पन्न झाला आहे. शासन स्तरावर संरक्षण व संवर्धनासाठी प्रयत्न होत असून लोकसहभाग आणि जनजागृतीची गरज आहे.
-माधुरी टेमगिरे, विभागीय वन अधिकारी, महाराष्ट्र जैवविविधता मंडळ, सिव्हिल लाइन्स, नागपूर

अहवालातील ठळक बाबी
  येत्या दहा वर्षांत १ लाख प्राणी व वनस्पती नष्ट होण्याचा इशारा
  शेकडो वर्षांपूर्वी पृथ्वीवरील डायनॉसॉर नष्ट झाले होते, त्यानंतरची ही सर्वांत मोठी हानी असणार आहे.
  उत्पादन, वापर या घटकांमध्ये स्थित्यंतरात्मक बदल केला नाही तर ही नष्ट होण्याची प्रक्रिया सुरूच राहणार.
  निम्मे उभयचर, एक तृतीयांश समुद्री सस्तन प्राणी धोक्‍यात  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com