गुंडप्रवृत्तीमुळेच ‘निमंत्रण वापसी’

गुंडप्रवृत्तीमुळेच ‘निमंत्रण वापसी’

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी (यवतमाळ) - गुंडप्रवृत्तीमुळेच ‘निमंत्रण वापसी’चा निर्णय आयोजकांना घ्यावा लागला. या निर्णयामुळे दुःखी झाले. पुन्हा असे प्रकार होणार नाहीत, याची खबरदारी घ्या, अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्त्या राणी बंग यांनी खडे बोल सुनावले. ज्यांची मुले इंग्रजी माध्यमातच्या शाळेत शिकतात, त्यांनी इंग्रजी लेखिकेला विरोध करावा का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

‘प्रतिभावंतांच्या सहवासात’ या कार्यक्रमात राणी बंग रविवारी सहभागी झाल्या होत्या. स. ना. पंडित आणि मोना चिमोटे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. बंग म्हणाल्या, की गेल्या काही दिवसांपासून संमेलनात गोंधळ सुरू आहे. पण तो दुःख देणारा आहे. एखादा पाहुणा न बोलावताही आला तरी आपण त्याचे आनंदाने स्वागत करतो, ही आपली संस्कृती आहे. तिचा विसर पडता कामा नये. आम्हाला अशा प्रकारचे अनुभव भारतातच काय परदेशातसुद्धा आले नाहीत. बंग म्हणाल्या, ‘‘स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, हे नव्या पिढीने समजून घ्यायला हवे. वाट्टेल तसे वागायचे, धिंगाणा घालायचे म्हणजे स्वातंत्र्य नव्हे. स्त्रियांचे नग्न मोर्चे हेसुद्धा चुकीचे आहेत. आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजातील मूल्य पाळणे आवश्‍यक आहे. पण, आधुनिकता, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कसेही वागले जात आहे. परदेशातील गोष्टी स्वीकारताना त्यांची शिस्तता, स्वच्छता स्वीकारतो का?’’

खरा सुसंस्कृत कोण? 
आदिवासी समाजात चोरी होत नाही. त्यांच्या घराला कुलूप नसते. ते भीक मागत नाहीत. मुलाच्या लग्नात हुंडा मागत नाहीत. मुलगा-मुलगी असा भेदभाव ते करीत नाहीत. स्त्रियांवर अत्याचार करीत नाहीत. त्यांच्यात सामूहिक निर्णयप्रक्रिया आहे. हे सगळे पाहून मला ‘खरा सुसंस्कृत कोण,’ असा प्रश्न पडतो, असे बंग यांनी सांगितले.


साहित्य महामंडळ आता मराठवाड्याकडे
सा  हित्य संमेलनाच्या स्वरूपातील बदलांपासून संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक बंद करण्यापर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय गेल्या तीन वर्षांत झाल्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे फिरते कार्यालय लवकरच मराठवाडा साहित्य परिषदेकडे जात आहे, त्यामुळे बंद पडलेले विश्व मराठी साहित्य संमेलन पुन्हा सुरू होणार, अशी चर्चा रंगू लागली आहे.

दर तीन वर्षांनी साहित्य महामंडळाच्या कार्यालयाचा कारभार मराठवाडा साहित्य परिषद (औरंगाबाद), मुंबई साहित्य संघ (मुंबई), महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे), विदर्भ साहित्य संघ (नागपूर) यांपैकी एका संस्थेकडे जात असतो. त्यानुसार विदर्भ साहित्य संघाची मुदत पुढील दोन महिन्यांत संपणार आहे. 

नऊ वर्षांपूर्वी मराठवाडा साहित्य परिषदेकडे साहित्य महामंडळाचे कार्यालय असताना विश्व मराठी साहित्य संमेलनाची सुरवात झाली. सॅन फ्रान्सिस्को, दुबई येथे संमेलन घेण्यात आले. टीका झाली तरी संमेलन यशस्वी करून दाखविले. 

कलाकृतीच ठरवते समीक्षेचा कल
प्रत्येक कलाकृती स्वतः तिच्या समीक्षेचा कल ठरवत असते, असा सूर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये आयोजित ‘मराठी समीक्षेची समीक्षा’ या परिसंवादात सहभागी वक्‍त्यांच्या भाषणातून निघाला. परिसंवादाच्या अध्यक्ष डॉ. रेखा इनामदार साने अनुपस्थित असल्याने अध्यक्षपद संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे मराठी विभागाचे प्रमुख डॉ. मनोज तायडे यांनी भूषवले. डॉ. तायडे यांनी कलाकृतीची समृद्धी अधिकाधिक चांगल्या पद्धतीने कशी वाढवता येईल, असा या सर्व समीक्षांचा प्रयत्न असल्याचे सांगितले. विदर्भ साहित्य संघाच्या अमरावती शाखेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. रमेश अंधारे यांनी मार्क्‍सवादी समीक्षेवर भाष्य केले. प्रत्येक समीक्षेचे निश्‍चित तत्त्वज्ञान असते, अशी माहिती प्रा. अंधारे यांनी दिली. डोंबिवली येथील पेंढारकर महाविद्यालयाच्या डॉ. धनश्री साने यांनी मानसशास्त्रीय समीक्षेचे विवेचन केले. लेखिका सुहासिनी कीर्तिकर यांनी समीक्षेचे फायदे-तोटे स्पष्ट केले.

साहित्य जीवनाचे महत्त्वाचे अंग
भाषा हा अभ्यासण्याचा विषय आहे व त्यादृष्टीने भाषा शिक्षणाकडे पाहिले गेले पाहिजे, असा सूर प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावर झालेल्या ‘साहित्यकेंद्री अभ्यासक्रमामुळे भाषा शिक्षणाची दुरवस्था’ या विषयावर आयोजित परिसंवादातून उमटला. अध्यक्षस्थानी प्रा. प्र. ना. परांजपे होते. अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले, की मराठीचे शिक्षण शाळा, महाविद्यालय, विद्यापीठातून दिले जाते. पदव्युत्तर अभ्यासक्रमात साहित्याबद्दलच जास्त माहिती आहे. विद्यार्थ्यांना भाषा नव्हे, तर साहित्यच जास्त शिकविले जाते. पूर्वी घरी भाषा शिक्षण मिळायचे. आता मात्र चित्र बदलले आहे. साहित्य हे जीवनाचे महत्त्वाचे अंग आहे; पण बीए, एमएचे विद्यार्थी साहित्य शिकायला येतात, हे म्हणणे चुकीचे आहे. प्रसाद देशपांडे म्हणाले, की भाषेच्या मर्यादा म्हणजे जगण्याच्या मर्यादा आहेत. साहित्यकेंद्री अभ्यासक्रमाचे दुष्परिणाम दिसत आहेत. स्वायत्त प्रकार म्हणून भाषा शिकविली जावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विद्यापीठ राजकारणात सापडल्याने भाषेची दुरवस्था झाल्याचा आरोप प्राचार्य रमेश जलतारे यांनी केला. डॉ. नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आवाज दाबल्याबद्दल डॉ. काशिनाथ बऱ्हाटे यांनी निषेध नोंदविला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com