लक्ष्य 900 एकर सिंचनाचे; 100 एकरही होत नाही 

मनोज खुटाटे 
सोमवार, 16 डिसेंबर 2019

या तलावातून 900 एकरांचे सिंचनक्षेत्र निर्धारित करण्यात आले आहे. सिंचन कालव्याची लांबी 5 किलोमीटर आहे. मात्र, तलावातून होणारे प्रत्यक्ष सिंचन क्षेत्र 100 एकरांपेक्षा जास्त होऊ शकले नाही.

जलालखेडा, (जि. नागपूर) :  नरखेड तालुक्‍यामधील रानवाडी तलावातून 900 एकर क्षेत्रात सिंचनाचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात 100 एकरही सिंचन होत नसल्याचे वास्तव आहे. मागील 33 वर्षांपासून या तलावातून पूर्ण सिंचन झाले नाही. आता या भागातील शेतकऱ्यांच्या दुसऱ्या पिढीला सिंचनाची प्रतीक्षा लागली आहे. 

तालुक्‍यातील जामगाव (बु.), रानवाडी, पानवाडी, जामगाव (खु.), मायवाडी, जोलवाडी ही गावे रानवाडी येथील तलावाच्या सिंचन क्षेत्रात येतात. या तलावातून 900 एकरांचे सिंचनक्षेत्र निर्धारित करण्यात आले आहे. सिंचन कालव्याची लांबी 5 किलोमीटर आहे. मात्र, तलावातून होणारे प्रत्यक्ष सिंचन क्षेत्र 100 एकरांपेक्षा जास्त होऊ शकले नाही. कालव्याची दुरुस्ती तसेच नाल्यावरील लोखंडी जलसेतू नादुरुस्त असल्यामुळे जामगाव (बु.)नंतर जामगाव (खु.), मायवाडी, जोलवाडी परिसरातील कालव्याचे पाणी शेतकऱ्यांना सिंचनासाठी आजपर्यंत मिळाले नाही. 

हेही वाचा : रामटेक मतदारसंघाला विकासाची आस 

यामुळे पाणी सोडणे बंद

या तलावाचे बांधकाम 1986 साली पूर्ण झाले. कालव्याचे बांधकाम रोजगार हमी योजनेतून झाले आहे. जे सीडी वर्क तसेच जलसेतू कंत्राटदारांकडून करण्यात आले. तलावातील पाणी सोडल्याने विहिरीचे बांधकाम ढासळले. यामुळे पाणी सोडणे बंद झाले. कालव्यातील जागेत झाडे वाढल्यामुळे कालवा दिसत नसल्याचे वास्तव आहे. रानवाडी तलावासाठी अनेक शेतकऱ्यांनी भविष्यात सिंचन होणार, या आशेत तलाव व कालव्यासाठी जमीन दिली. मात्र, त्याचा फायदा काहीच झाला नाही. शेतकरी बाबुलाल बेहनीया, बालाजी बनसोड हे भूमिहीन झाले. आज त्यांची पिढी जमीन नसल्याने मजुरी करीत आहे. 

हेही वाचा : पैसे बुडव्या व्यापाऱ्यांना बंदी 

अधिकारी करतात दिशाभूल

लघुसिंचन विभागाचे अधिकारी या प्रकल्पाकडे दुर्लक्ष करतात. निधी नसल्याचे कारण पुढे करून लोकप्रतिनिधींची वेळोवेळी दिशाभूल केली. परिणामी संत्रा बागायतदारांना मोठा फटका बसला आहे. मायवाडी, जामगाव, जोलवाडी या परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी बोअरवेल करावे लागत आहे. मात्र, सिंचनासाठी तलाव असताना त्याचा फायदा मिळत नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Irrigation became a dream in Ranwadi talao