esakal | सावधान! गडचिरोली जिल्ह्यातील या रस्त्यांवरून प्रवास करणे धोकादायक; रस्त्यावरील खड्ड्यांची केव्हा होणार दुरुस्ती?
sakal

बोलून बातमी शोधा

गडचिरोली : वैरागड येथील रस्त्याची झालेली दुरवस्था.

गडचिरोली जिल्ह्यातील अनेक रस्त्यांवरून प्रवास करणे नागरिकांना महागात पडणार आहे. तालुक्यातील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे वाहनचालकांना रस्त्यावरून प्रवास करताना तारेवरची कसरत करीवा लागत आहे. मात्र सर्वजनिक बांधकाम विभागाचे या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे.

सावधान! गडचिरोली जिल्ह्यातील या रस्त्यांवरून प्रवास करणे धोकादायक; रस्त्यावरील खड्ड्यांची केव्हा होणार दुरुस्ती?

sakal_logo
By
मिलिंद उमरे

गडचिरोली : रस्त्यांना विकासाच्या वाहिन्या म्हणतात. जेथे दळणवळणाच्या सुविधांचा विकास होतो, त्या परिसराचा विकास जलद गतीने होतो. पण, गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत अद्याप अनेक ठिकाणी रस्तेच नसून जेथे रस्ते आहेत तेथील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. अनेक खड्डे असलेल्या या रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शिवाय अनेक नवीन रस्ते बांधकामानंतर काही दिवसांतच खराब होत असल्याने या सदोष बांधकामातील दोषींना हुडकून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

आरमोरी तालुक्‍यातील वैरागड येथील मानापूर रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली आहे. या परिसरातील मानापूर रस्त्यावर जुना बाजाराजवळ नेहमीच खड्डे पडत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे सिमेंट-काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात आला, परंतु पंधरा-वीस दिवसांतच या रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. म्हणून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

अवश्य वाचा : गोंदिया जिल्ह्यातील लोधीटोलामधील शेतात आढळला वाघाचा मृतदेह; वनविभागाला मृत्यूचे कारण कळेना

सदोष बांधकाम

बांधकामानंतर अवघ्या काही दिवसांतच या रस्त्यावर भेगा आणि खड्डे पडल्यामुळे संबंधित कंत्राटदार व विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी करावी. तसेच सदोष बांधकामास दोषी असणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. केवळ हाच रस्ता नव्हे, तर जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे हे रस्ते नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. चामोर्शी तालुक्‍यातील हरणघाट-मूल मार्ग, आलापल्ली-सिरोंचा मार्ग, धानोरा, कुरखेडा, कोरची, आरमोरी, गडचिरोली, देसाईगंज, मुलचेरा, अशा बहुतांश तालुक्‍याच्या ग्रामीण भागांतील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे.

देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष

यावर्षी जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे ग्रामीण भागातील खेड्यांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यांवरून वाहन चालविताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात अपघाताच्या घटना घडत असल्याने रस्त्यांची दुरवस्था ही जीवघेणी ठरत आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळल्याने रस्त्यांची पुरती चाळण झाली आहे. वाहनांची वर्दळ पाहता या रस्त्यांची सतत देखभाल व दुरुस्ती होणे गरजेचे आहे. परंतु संबंधित विभागाकडून रस्त्यांच्या दयनीय अवस्थेची पाहणी करून त्यावर उपाययोजना करण्याची तसदी अद्याप घेण्यात आली नाही. परिणामी नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे बांधकाम विभागाने सातत्याने डोळेझाक केल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

जाणून घ्या : वा रे पोलिस! गुंडांवर उफाळून आले प्रेम? रात्रभर जागून ग्रामस्थांनी पकडलेले गुंड पोलिसांनी दिले सोडून

कंत्राटदारांची मनमानी…

रस्ते बांधकाम व दुरुस्तीच्या कामामध्ये कंत्राटदाराचा मनमानी कारभार चालत असल्याने बांधकाम साहित्य निकृष्ट दर्जाचे वापरून सर्रास रस्त्याची कामे केली जात आहेत. त्यामुळे पावसाळा नसला; तरी अल्पावधीतच रस्त्याच्या चिंधड्या होतात. त्यामुळे अशा कंत्राटदारांची चौकशी करून त्यांना काळ्या यादीत टाकावे तसेच त्यांना साथ देणाऱ्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

loading image
go to top