अरे देवा...पुन्हा पाऊस येणार!

अनुप ताले
Tuesday, 17 March 2020

पुन्हा ढग दाटून येणार असून, पुढील तीन ते चार दिवस जिल्ह्यासह विदर्भात पाऊस हजेरी लावणार असल्याचे संकेत हवामान तज्ज्ञांनी दिले आहेत.

अकोला : यावर्षी प्रत्येक महिन्यात हजेरी लावणारा पाऊस अजूनही उसंत घ्यायला तयार नाही. गत आठवड्यातही पावसाने शेतकऱ्यांना दणका दिला आणि आता पुन्हा ढग दाटून येणार असून, पुढील तीन ते चार दिवस जिल्ह्यासह विदर्भात पाऊस हजेरी लावणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

 

हे ही वाचा : न विचारता केले कर्जाचे पुनर्गठन!

यावर्षी मॉन्सूनचे आगमन जवळपास महिनाभर उशिरा झाले. त्यानंतर मात्र सतत व ऑक्टोबर अखेरपर्यंत पावसाने शेते व नागरी विभाग झोडपून काढले. परिणाम स्वरुप अतिवृष्टीची नोंद झाली आणि शेत पिकाचे मोठे नुकसान झाले. पावसाचा लहरीपणा एवढ्यावरच थांबला नाही तर, नोव्हेंबर, डिसेंबर व पुढील प्रत्येक महिन्यात पावसाने हजेरी लावून लोकांना हैरान करुन सोडले. वातावरणात वेळोवेळी बदल झाल्याने रोगराईचे प्रमाणही वाढले. आता उन्हाळा सुरू झाला मात्र पाऊस पाट सोडायला तयार नाही. गत आठवड्यातच पावसाने अकोल्यासह लगतच्या भागात व पूर्व विदर्भात वादळी हजेरी लावून गहू, हरभरा, लिंबू, आंबा, पपई, भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान केले. आताही पावसाचे सावट कायम असून, पुढील तीन ते चार दिवस जिल्ह्यासह विदर्भात पावसाचे संकेत हवामान विभागाने वर्तविले आहेत.

 

हे ही वाचा : चामडी सोलली तरी चालेल...पण, तू ताप बाबा!

उत्तरेकडील वातावरण बदलाचा परिणाम
उत्तरेकडील प्रदेशात वातावरण बदल, पाऊस, थंडीची लाट तसेच काही भागात नुकतीच बर्फवृष्टी झाली आहे. झारखंडमध्येही सतत पाऊस सुरू होता. यामुळे महाराष्ट्रातही हवामान बदल दिसून येत आहे. याचाच परिणाम म्हणून पुढील तीन ते चार दिवस विदर्भात पाऊस व थंडी राहू शकते.
- संजय अप्तुरकर, हवामान तज्ज्ञ, नागपूर

 

हे ही वाचा : ‘एसटी’ला कोरोनाचा फटका!

पुढच्या आठवड्यात तापणार सूर्य
कोरोना व्हायरसचा थैमान रोखण्यासाठी तडाख्याचे ऊन पडणे आवश्यक असल्याची चर्चा आहे. अशातच ढगाळ वातावरण व पावसाचे संकेत यामुळे लोकांनी चिंतेत टाकले आहे. परंतु, पुढच्या आढवड्यापासून तिव्र उन्हाळा जाणवण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवून दिलासा दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It will rain again!