नरभक्षकाच्या मागावर इटालियन श्‍वान...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

यवतमाळ - 'टी-1' या नरभक्षक वाघिणीचा शोध घेण्याची मोहीम गेल्या महिनाभरापासून युद्धपातळीवर सुरू आहे; परंतु अद्याप तिचा ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे आता वनविभागाने "केन कॉर्सो' जातीचे दोन इटालियन शिकारी श्‍वान आणि जंगलाची आकाशातून टेहळणी करण्यासाठी "पॉवर ग्लॅडर' आणले आहे. हे पॉवर ग्लॅडर उद्या (ता. 10) उडणार असून, वाघिणीची हवाई शोधमोहीम त्या अनुषंगाने सुरू होणार आहे.

'टी-1' वाघिणीला पकडण्यासाठी वनविभागाने मोहीम सुरू केली आहे. पहिल्या मोहिमेत पाच हत्तींसह दोनशे कर्मचारी तिला शोधत होते. परंतु मागील आठवड्यात या ताफ्यातील एका हत्तीने धुमाकूळ घालून एका महिलेला ठार केले होते. त्यामुळे या मोहिमेतील सर्वच हत्तींना परत पाठविले गेले. हैदराबादवरून पाचारण केलेल्या शार्पशूटर नवाब शपतअली खान याला पुन्हा मोहिमेत सहभागी करून घेतले आहे. त्याने आपल्या इटालियन "केन कॉर्सो' जातीच्या दोन शिकारी श्‍वानांसह "पॉवर ग्लॅडर'ने जंगलाची टेहळणी सुरू केली आहे. मात्र, अजूनही वाघिणीचा मागमूस घेणे वनविभागाला शक्‍य झाले नाही.

वर्धा जिल्ह्यात वासराची शिकार
राळेगाव वनपरिक्षेत्रात नरभक्षक वाघीण पकडण्यासाठी वनविभागाच्या नाकीनऊ येत आहे. अशात आता आणखी एका वाघाची भर पडल्याची चर्चा आहे. ज्या भागात वाघिणीचे शेवटचे लोकेशन आढळले होते, त्या भागापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या वर्धा जिल्ह्यातील अंबोडा येथे एका वासराची वाघाने शिकार केल्याची घटना घडली. वनविभागाने शोध घेतला असता ही शिकार वाघाने केल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आले. वाघ जिल्ह्याच्या सीमेलगत असल्याने त्याचा प्रवेश जिल्ह्यात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

Web Title: Italian Dog Use for Tiger Searching