जांभुळ पिकल्या झाडाखाली रोजगार मिळतो शेकडो हातांना

jambhul
jambhul

भंडारा : काळी, टप्पोरी, रसरशीत पिकलेली जांभळे बघितली की, "जैत रे जैत" या चित्रपटातील कवी ना. धो. महानोर यांचे जांभुळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजं जी। हे गाणे प्रत्येकाच्या मनात नकळत येऊन जाते. रंग, रूप आणि चवीनेही हवीहवीशी वाटणारी ही जांभळे साऱ्यांच्या आवडीची. मात्र, टोपलीत सजून तोऱ्यात बसलेली ही जांभळे अलगदपणे झोळीत तोडून आणणाऱ्या हातांना मात्र, खूप कष्ट आणि परिश्रम करावे लागतात हेही तितकेच खरे.

गावखेड्यांतून पायपीट करून जांभळाच्या पाट्या (टोपल्या) आणणाऱ्यांची गर्दी सध्या शहरातील मिस्किनटॅंक उद्यानालगत सकाळी दिसून येते. शहरालगतची काही खास गावे जांभळाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. मृगाचा पाऊस पडताच या गावातून अनेक महिला, पुरुष जांभळे घेऊन दाखल होतात. पूर्वीच्या तुलनेत जांभुळवृक्षांची संख्या रोडावली आहे. तरीही या माध्यमातून त्यांना आठ दहा दिवसांत हंगामी रोजगार उपलब्ध होतो.

नांदोरा, मारेगाव, कवडसी, दवडीपार व नजीकच्या काही मोजक्‍याच गावात जांभळाचे उत्पादन होते. प्रत्येक गावांत अंदाजे 60 ते 70 झाडे आहेत. ही झाडे शेतकऱ्यांच्या शेतशिवारात असून ती दरवर्षी ठेक्‍याने दिली जातात. झाडाचा आकार व उत्पादनक्षमता पाहून ठेक्‍याचा दर ठरविला जातो. बाराशे रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंत ही झाडे ठेक्‍याने घेतली जातात. जांभूळ तोडून ते ठोक भावात विक्रीसाठी नेणारी जवळपास 80 ते 90 कुटुंबे परंपरेने या व्यवसायात आहेत. दहा ते पंधरा दिवसांच्या या हंगामात त्यांना पंधरा ते वीस हजार रुपयांची मिळकत होते. परंतु, त्यामागे खूप परिश्रम व मेहनत करावी लागते.
हल्ली हायब्रीड जांभुळ इतर ठिकाणावरून येत असले तरी गावठी जांभळाच्या चवीची सर त्यांना नाही. वाडवडिलांपासून हे काम सुरू आहे. गेल्या 25 वर्षांपासून आपण या व्यवसायात असल्याचे नांदोरा येथील राधेश्‍याम जाखमाटे यांनी सांगितले.

गारपीट व वादळीपावसाने नुकसान
साधारण एप्रिलमध्ये जांभळाला छोटी-छोटी फिक्कट हिरव्या रंगाची लांबट फळे धरू लागतात. फळांची स्थिती पाहून झाडाचा ठेका ठरविला जातो. हळूहळू फळांचा रंग गडद होऊन ती पिकू लागतात. दरम्यान, यावर्षी अवकाळी व वादळी पाऊस, गारपीट यामुळे जांभळाचे उत्पादन घटल्याचे सांगण्यात येते. गारपीटीमुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात जांभळे गळून पडल्याने ठेका घेणाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जांभळाच्या झाडावर पक्षीही भरपूर येतात. कावळे, पोपट, वटवाघळे यांचा वावर सतत या जांभळाच्या झाडावर असतो. त्यामुळेही उत्पादनात बरीच घट येते.

जांभुळ तोडण्याचे काम कष्टाचे
जांभळे जमिनीवर पडली की फुटून त्यांना माती लागते. फुटलेल्या जांभळांना भाव मिळत नाही. झाडाची जांभळे फांद्या हलवून किंवा दगड मारुन चोरी करण्याचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे झाडाची राखण करावी लागते. उंच असलेल्या झाडाच्या फांद्या नाजुक असतात. केव्हा तुटतील याचा नेम नसतो. त्यामुळे जीव मुठीत घेऊनच झाडावरून जांभळे अलगद तोडून खाली साडी किंवा चादर घेऊन उभ्या असलेल्या व्यक्तीच्या झोळीत टाकली जातात. तास दीड तासात एका झाडाची जांभळे तोडून होतात. ही जांभळे मग टोपल्यात भरून विक्रीसाठी शहरात सायकल वा इतर साधनाने आणली जातात. जांभळाच्या टोपलीला(पाटी) असे संबोधले जाते. जांभळाचा आकार, रंग व चव पाहून त्याचे दर ठरविले जातात. सध्या एका पाटीला 900 ते हजार रुपयांपर्यंतचा भाव आहे. किरकोळ विक्रेते 80 ते 90 रुपये शेकडा याप्रमाणे ग्राहकांना विक्री करत आहेत.

सविस्तर वाचा - ठकबाज प्रीती दास जेलमध्ये क्‍वारंटाईन

व्यावसायिक तत्त्वावर लागवडीची गरज
जांभळाला औषधी गुणधर्म असल्याने त्यांना मोठी मागणी आहे. अलीकडे वृक्षतोडीमुळे जांभळाच्या झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. भविष्यात मोठ्या व्यावसायिक उलाढालीची क्षमता असलेल्या या बागायतींसाठी शेतकऱ्यांनी तयारीला लागायला हवे. औषधी गुणधर्माचे फळ आजतागायत व्यावसायिक दृष्टिकोनातून दुर्लक्षित राहिले आहे. बाजारपेठेत वाढती मागणी पाहता हे पीक परिसरातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीमध्ये मोलाचा हातभार लावू शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com