कोरोनाला हरविण्यासाठी गडचिरोली शहरात ३० सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यू

मिलिंद उमरे
Sunday, 20 September 2020

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गडचिरोली शहरात २३ ते ३० सप्टेंरपर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्यात येत आहे. अनेक दिवसांपासून कोरोनाच्या काळ्या छायेत नसलेला गडचिरोली जिल्हा आता समस्याग्रस्त होत आहे. त्यामुळे कोरोनाला हरविण्यासाठी जनता कर्फ्यूच लावणे गरजेचे आहे.

गडचिरोली : मागील काही दिवसांपासून गडचिरोली शहरात कोरोना विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असून त्यामुळे काही नागरिकांचे मृत्यू झाले आहेत. हा वाढत असलेला प्रसार थांबविण्यासाठी व जनतेची सुरक्षा व हित लक्षात घेऊन गडचिरोली शहरातील व्यापारी संघटना, नगर परिषद प्रशासन व सर्वपक्षीय नेत्यांनी २३ ते ३० सप्टेंबर २०२० म्हणजे बुधवार ते बुधवार गडचिरोली शहर पूर्णपणे बंद ठेवून जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

 

या निर्णयानुसार गडचिरोली शहरातील सर्व दवाखाने, मेडिकल व वैद्यकीय व्यवस्था सुरू राहणार आहेत. या जनता कर्फ्यूला सर्व जनतेने सहकार्य करून यशस्वी करावे, असे आवाहन गडचिरोली शहरातील व्यापारी संघटना, नगरपालिका गडचिरोली व सर्वपक्षीय नेत्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेला केले आहे.

 

या पत्रकार परिषदेला गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार तथा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगिता पिपरे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रवी चन्नावार, उपाध्यक्ष हरीश राठी, दिलीप सारडा, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवी वासेकर, शिवसेनेचे नेते नंदू कुमरे, भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, नगर परिषदेचे उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, भाजप शहराध्यक्ष मुक्तेश्‍वर काटवे, कॉंग्रेस युवा आघाडीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, नगरसेवक केशव निंबोळ, पंचायत समिती उपसभापती विलास दशमुखे, नगरसेवक सतीश विधाते, भाजीपाला व फळे संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पुप्पलवार, सचिव भोजराज खोडवे, उपाध्यक्ष अझरुद्दीन शेख, हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पतरंगे, सचिव रोशन कवाडकर, हेमंत राठी, प्रफुल्ल बिजवे यांच्यासह शहरातील व्यापारी व दुकानदार उपस्थित होते.

कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण वाढले

अनेक दिवसांपासून कोरोनाच्या काळ्या छायेत नसलेला गडचिरोली जिल्हा आता समस्याग्रस्त होत आहे. नागपूर, चंद्रपूर पाठोपाठ आता गडचिरोली जिल्ह्यातही कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला पायबंद घालणे गरजेचे अहे. त्यासाठी नियम कठोर करणे आवश्‍यक आहे. म्हणूनच जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

जाणून घ्या : ही लक्षणं देतात शरीरातील कमी ऑक्सिजनची पूर्वसूचना; हे उपाय करा आणि मिळवा नैसर्गिक ऑक्सिजन

मृत्यूसत्र झाले सुरू

कोरोना संसर्ग प्रारंभ झाल्यावर मार्च महिन्यापासून मागील महिन्यापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात कोरोनामुळे केवळ एकमेव मृत्यूची नोंद होती. पण, आता मृत्यूसत्र प्रारंभ झाले असून शनिवार (ता. 19१९) पर्यंत ही संख्या दोन आकडी म्हणजे १० पर्यत पोहोचली आहे. शनिवारी एकाच दिवशी कोरोनामुळे दोघांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे कठोर निर्णय घेणे क्रमप्राप्त झाले आहे.

 

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: janta curfew in Gadchiroli till September 30 to defeat Corona