नक्षलवाद्यांशी दोन हात करणारे जवान करताहेत आता हे काम...वाचा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 मे 2020

नक्षलवाद्यांशी दोन हात करणारे पोलिस मात्र दिवसरात्र जंगलात सुरक्षेसाठी आपला जीव धोक्‍यात घालून कर्तव्य बजावत आहेत. हे काम करताना सामाजिक कार्यावरही त्यांचा भर असतो. एटापल्ली तालुक्‍यातील नक्षलग्रस्त पुरसलगोंदी गावात उपविभाग हेडरीअंतर्गत येत असलेल्या आलदंडी येथील पोलिस मदत केंद्रातील जवानांनी तलाव खोलीकरणासाठी पुढाकार घेतला आहे.

गडचिरोली : दुर्गम गावाच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून नक्षलवादी विकासात अडसर ठरत असल्याने विकासकामांत आडकाठी येत आहे. अशा परिस्थितीत रस्ते, पुलाचे बांधकाम तसेच पाणीपुरवठ्याच्या योजना रखडल्या आहेत. ही समस्या जाणून गडचिरोली पोलिस दलाने नक्षलग्रस्त एटापल्ली तालुक्‍यातील पुरसलगोंदी या गावात श्रमदानातून गाव तलावाच्या खोलीकरणाचे काम हाती घेतले आहे.

 

गडचिरोली जिल्ह्याची बारमाही वाहणाऱ्या नद्यांचा जिल्हा म्हणून ओळख आहे. परंतु सिंचनाची सोय नसल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. उद्योग नसल्याने रोजगाराची समस्याही उद्भवते. गडचिरोली जिल्ह्यातील कित्येक गावे दुर्गम असल्याने प्रशासन तेथपर्यंत पोहोचत नाही.

 

तलाव खोलीकरणासाठी पुढाकार

नक्षलवाद्यांशी दोन हात करणारे पोलिस मात्र दिवसरात्र जंगलात सुरक्षेसाठी आपला जीव धोक्‍यात घालून कर्तव्य बजावत आहेत. हे काम करताना सामाजिक कार्यावरही त्यांचा भर असतो. एटापल्ली तालुक्‍यातील नक्षलग्रस्त पुरसलगोंदी गावात उपविभाग हेडरीअंतर्गत येत असलेल्या आलदंडी येथील पोलिस मदत केंद्रातील जवानांनी तलाव खोलीकरणासाठी पुढाकार घेतला आहे.

अनेक गावांना मिळणार लाभ

हे गाव अतिसंवेदनशील असल्याने नक्षलवाद्यांकडून केव्हाही हल्ला होऊ शकतो किंवा अन्य घटना घडून जवानांचे नुकसान करू शकतात. त्यामुळे श्रमदानासाठी लागणाऱ्या साहित्यासोबतच पोलिसांना आपल्या बंदुकांवरही नजर ठेवावी लागते. या तलावाच्या खोलीकरणामुळे पुरसलगोंदीलगतच्या अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासोबतच शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ तसेच मासेमारीसाठी फायदा होणार आहे.

जाणून घ्या  : राब राब राबणारा शेतकरी का जातो खासगी व्यापाऱ्यांकडे...हे आहे कारण...वाचा

जिल्हा पोलिस अधीक्षकांचे मार्गदर्शन

जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अनेक ठिकाणी जवानांनी श्रमदान करून रस्त्याची डागडुजी तसेच पूल दुरुस्तीची कामे केली. त्यात आता पुरसलगोंदी गावात सुरू असलेल्या तलाव खोलीकरणाच्या उपक्रमाने भर टाकली आहे. पोलिस दलाच्या प्रयत्नामुळे पिण्याच्या पाण्यासोबतच ग्रामस्थांना मासेमारीतून रोजगार उपलब्ध होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The jawans deepened the lake