#NagpurWinterSession : शेतकरी मदतीवरून भाजपचे ढोंग : जयंत पाटील 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 डिसेंबर 2019

राज्य सरकारमार्फत मदतीचे वाटप सुरू आहे. मंजूर केलेल्या सहा हजार 600 कोटी रुपयांपैकी दोन हजार शंभर कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वितरित केले आहेत. उर्वरित रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. 

नागपूर : भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचे केवळ ढोंग करीत आहे. त्यांना अचानक शेतकऱ्यांचा पुळका आला आहे. अवकाळी पावसादरम्यान यांचेच सरकार सत्तेत होते. तेव्हा यांनी काय केले हे जनतेला माहिती आहे. जनतेचा विश्‍वास गमावल्यानेच आता हे विरोधात बसले आहेत. विधानसभेत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा करण्याऐवजी सरकारचे म्हणने ऐकून घेण्याऐवजी केवळ गोंधळ घालत आहे. पण, तुम्ही चिंता करू नका, आमचे सरकार सक्षम आहे. सरकार पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करणार आहे, असे अर्थमंत्री जयंत पाटील म्हणाले. 

केंद्राकडे 14,600 कोटींची मागणी

राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य सरकारने सहा हजार सहाशे कोटी रुपये मंजूर केले असून, यापैकी दोन हजार शंभर कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या मदतीसाठी आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारने 14 हजार 600 कोटी रुपयांची मागणी केंद्र सरकारकडे केली असल्याची अशी माहिती अर्थमंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेत दिली. 

हेही वाचा - #NagpurWinterSession : विधानसभेपाठोपाठ परिषदेतही गोंधळ, दिवसभरासाठी स्थगित

शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने मदत करण्याचे आश्‍वासन

विधानसभेत दुसऱ्याही दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपयांची मदत करावी अशी मागणी करीत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची मागणी विरोधी पक्षांनी केल्यानंतर त्याला उत्तर देताना अर्थमंत्री बोलत होते. वित्तमंत्री म्हणाले, राज्य सरकारमार्फत मदतीचे वाटप सुरू आहे. मंजूर केलेल्या सहा हजार 600 कोटी रुपयांपैकी दोन हजार शंभर कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वितरित केले आहेत. उर्वरित रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. 

आतापर्यंत दोन हजार कोटींची मदत दिली

राज्य सरकारने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सात हजार 400 कोटी रुपये तर अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सात हजार 200 कोटी रुपये अशी एकूण 14 हजार 600 कोटी रुपयांची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. राज्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही अर्थमंत्र्यांनी दिली. 

सविस्तर वाचा - #NagpurWinterSession : शेतकऱ्यांना दिलेले वचन पाळणार : मुख्यमंत्री (व्हिडिओ)

'तुम्हाला घोषणांचे प्रशिक्षण देतो'

राज्यात पाच वर्षे महाविकास आघाडीची सत्ता राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला विधानसभेत भाजपला गोंधळ घालणासाठी पाच वर्षे संधी आहे. पण तुम्हाला घोषणा देण्याची सवय नसल्याने आमच्याकडे या तुम्हाला घोषणांचे प्रशिक्षण देतो असे म्हणून वित्तमंत्री जयंत पाटील यांनी विरोधीपक्षाला चिमटा काढला. अवकाळी आणि परतीच्या पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याच्या संदर्भात सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनासंदर्भात निवेदन देताना ते बोलत होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jayant patil says BJP pretends to help farmers