दिग्रसमध्ये "ज्वेलरी थिप'चा प्रताप ः बसमध्ये महिलांच्या दागिन्यांवर डल्ला 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

फुलसावंगी (ता. महागाव) येथून आलेल्या तीन महिलांनी दिग्रस येथील मानोरा चौकातून दुपारी एकच्या सुमारास नागपूर-पुसद ही बस थांबविली व त्यात तिघीही चढल्या. पुढील शिवाजी चौक थांब्यावर त्या महिलांना आपले सहा ग्रॅम सोन्याचे दागिने व एक हजार 100 रुपये चोरीला गेल्याचे समजले.

दिग्रस (जि. यवतमाळ) : येथील मानोरा चौकातून नागपूर-पुसद एसटी बसमध्ये बसलेल्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने व रोख रुपये काही भामटे घेऊन लंपास झाले. ही घटना गुरुवारी (ता.7) दुपाएकच्या सुमारास घडली. चोरी झाल्याचे लक्षात येताच गोंधळलेल्या महिलांनी झडतीसाठी एसटी बस थेट येथील पोलिस ठाण्यातच आणल्याने एकच खळबळ उडाली. 

फुलसावंगी (ता. महागाव) येथून आलेल्या तीन महिलांनी दिग्रस येथील मानोरा चौकातून दुपारी एकच्या सुमारास नागपूर-पुसद ही बस थांबविली व त्यात तिघीही चढल्या. पुढील शिवाजी चौक थांब्यावर त्या महिलांना आपले सहा ग्रॅम सोन्याचे दागिने व एक हजार 100 रुपये चोरीला गेल्याचे समजले.

याच बसमधील दुसऱ्या एका महिलेचा मोबाईल व दीड हजार रुपये चोरीस गेल्याने महिलांनी आरडाओरड केली. बसमध्येच चोरी झाली आहे, असा समज करून महिलांनी एसटी बस थेट दिग्रस पोलिस ठाण्यात घेऊन चला, असा रेटा वाहक आणि चालकाकडे धरला. त्यामुळे बसचालक व वाहकाने बस पोलिस ठाण्यात आणली. चौकशी व झडती झाली. परंतु, बसमध्ये बसतानाच काही भामट्यांनी चलाखीने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. जवळचे रुपये व सोने चोरी गेलेल्या महिलांची तक्रार ठाणेदार आम्ले यांनी दाखल करून त्यांना पुढील प्रवासासाठी पैसे देऊन रवानगी केली. त्यानंतर चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना केले. 

चोरट्यांकडून गर्दीचा गैरफायदा 
सध्या दिवाळी व भाऊबीजेनिमित्त महिला प्रवाशांची वर्दळ वाढल्याने दागिने चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पोलिसांनी दक्षता घेऊन येथील काही भामट्यांचे कासरे ओढावेत व बसथांबा परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Jewelery Thip' in Digras: Women's jewelry bus on bus