जिजाबाई गातात वेदनेची गाणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

यवतमाळ : सोशल मीडियाच्या क्रांतीमुळे प्रसिद्धीपासून दूर असलेले, गावाखेड्यात लपलेले टॅलेंट आता समोर येऊ लागले आहे. पश्चिम बंगालमधील रेल्वे स्टेशनवरील राणू मोंडाल या महिलेच्या गाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांना आता संगीतकार हिमेश रेशमिया यांनी चित्रपटात गाण्याची संधी दिली. महाराष्ट्रातील अशाच प्रकारचा एक सुरेल आवाज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या आहेत 70 वर्षांच्या जिजाबाई भगत. शेतमजूर असलेल्या जिजाबाई अत्यंत सुरेल अशी हिंदी, मराठी गाणी म्हणतात.

यवतमाळ : सोशल मीडियाच्या क्रांतीमुळे प्रसिद्धीपासून दूर असलेले, गावाखेड्यात लपलेले टॅलेंट आता समोर येऊ लागले आहे. पश्चिम बंगालमधील रेल्वे स्टेशनवरील राणू मोंडाल या महिलेच्या गाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांना आता संगीतकार हिमेश रेशमिया यांनी चित्रपटात गाण्याची संधी दिली. महाराष्ट्रातील अशाच प्रकारचा एक सुरेल आवाज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या आहेत 70 वर्षांच्या जिजाबाई भगत. शेतमजूर असलेल्या जिजाबाई अत्यंत सुरेल अशी हिंदी, मराठी गाणी म्हणतात. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातल्या हरसुल या त्यांच्या गावातील लोकांनाच माहिती असलेल्या जिजाबाईंचे गाणे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभर पोचले आहे.

मोलमजुरी करणाऱ्या सत्तरीतील जिजाबाईंचा रोजच्या जगण्याशी संघर्ष सुरू आहे. सोबतीला आहेत ती फक्त गाणी. तीच त्यांची जगण्याची उर्जा आहे. आयुष्यभर अविवाहित राहिलेल्या जिजाबाई भावाच्या घरीच राहतात. जिजाबाई तशा कलाकार कुटुंबातील. त्यांचे मोठे भाऊ श्याम भगत हे परिसरातील नावाजलेले 'पेंटर' होते. जिजाबाई उत्तम गाणी म्हणतात, हे हरसुल गावातील लोकांना माहिती आहे. त्यामुळे शेतात मजुरीला निघालेल्या जिजामावशीला घडीभर थांबवून लहानथोर तिला गाणं म्हणायला सांगतात. त्याही आढेवेढे न घेता आपल्या सुरेल आवाजाने ऐकणाऱ्याला मंत्रमुग्ध करतात.

विशेष म्हणजे शाळेत न गेल्याने त्यांना अक्षरांशी ओळख नाही. मात्र, त्यांची शेकडो गीते तोंडपाठ आहेत.वाढत्या वयात जिजाबाईंना शरीर साथ देत नाही. एक अधू हात घेऊन त्या शेतात राबतात. 

वेदनेचे गाणे...
मोलमजुरीच्या आयुष्यात जिजाबाईंनी अनेक चढ-उतार पाहिले. वयाच्या तिशीत त्यांना कॅन्सरने ग्रासले. त्या जीवघेण्या आजारावर त्यांनी मात केली. पण, त्यानंतर त्यांना जगण्याची खरी उर्जा दिलं ती गाण्याने. त्यामुळे आयुष्याच्या संध्याकाळीही त्यांनी गाण्यांची साथ सोडली नाही अन् गाणीही जिजाबाईला सोडून गेली नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jijabai Bhagat singing songs of pain