esakal | जिरोबा वस्तीला कचऱ्याचा वेढा; वादळाचा तडाखा
sakal

बोलून बातमी शोधा

लाखांदूर : जिरोबा वस्तीतील नागरिकांनी अडविलेल्या घंटागाड्या.

लाखांदूर नगर पंचायतीद्वारे गावातील घनकचरा गोळा जिरोबा परिसरात साठवला जातो. मात्र, अद्याप त्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प तयार झाला नाही. सोमवारी सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यामुळे साठवलेला घनकचरा संपूर्ण वस्तीत विखुरला. कचऱ्यामुळे अस्वच्छता वाढून दुर्गंधी पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात येत आहे.

जिरोबा वस्तीला कचऱ्याचा वेढा; वादळाचा तडाखा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लाखांदूर (जि. भंडारा) : नगरपंचायत क्षेत्रातील घनकचरा येथील जिरोबा लोकवस्तीजवळ साठवून ठेवला जातो. सोमवारी अचानक आलेल्या वादळाच्या तडाख्यामुळे संपूर्ण वस्तीत कचरा विखुरला आहे. याच परिसरात पिण्याच्या पाण्याच्या टाकीसह, शाळा, अंगणवाडी आहेत. कचऱ्यामुळे अस्वच्छता वाढून दुर्गंधी पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात येत आहे. त्यामुळे या भागात घनकचरा टाकण्यास येथील नागरिकांनी विरोध करून घंटागाड्या अडवून ठेवल्या.

लाखांदूर नगर पंचायतीद्वारे गावातील घनकचरा गोळा जिरोबा परिसरात साठवला जातो. मात्र, अद्याप त्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प तयार झाला नाही. सोमवारी सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यामुळे साठवलेला घनकचरा संपूर्ण वस्तीत विखुरला. नगरपंचायत गोळा केलेला घनकचरा काही महिन्यापासून जिरोबा वस्तीलगतच्या खुल्या मैदानात साठविला जात आहे. साठवण झालेल्या घनकचऱ्यात ओला व सुका कचरा या दोहोंचाही समावेश आहे. मागील काही महिन्यांपासून या भागात घनकचऱ्याचे मोठे ढीग निर्माण झाले होते. मात्र, कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकडे नगर प्रशासनाने कोणतीही उपाययोजना केली नाही.

घंटागाड्या चार तास अडवून ठेवल्या

सोमवारी सुसाट वाऱ्याने या वस्तीतील नागरिकांच्या घरांत व परिसरात हा कचरा पसरल्याने वस्तीत दुर्गंधी निर्माण झाली आहे. या घटनेने संतापलेल्या नागरिकांनी वस्तीत पसरलेल्या कचऱ्याची तत्काळ विल्हेवाट लावण्याची मागणी करून मंगळवारी सकाळी परिसरात कचरा टाकण्यास विरोध केला. त्यामुळे गावातून कचरा आणणाऱ्या घंटागाड्या चार तास अडवून ठेवल्या होत्या. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आश्‍वासन

यावेळी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी सौरव कावळे, नगराध्यक्ष भारती दिवठे, उपाध्यक्ष प्रल्हाद देशमुख, कर निर्धारण अधिकारी चव्हाण, नगरसेविका दिव्या राऊत, पोलिस उपनिरीक्षक संदीप ताराम व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन नागरिकांची समजूत काढली. या भागात पसरलेल्या घनकचऱ्याची तत्काळ विल्हेवाट लावण्याचे आश्‍वासन पदाधिकाऱ्यांनी दिले.

हेही वाचा : या जिल्ह्यातही केला कोरोनाने शिरकाव; महिला रुग्ण आढळली पॉझिटिव्ह

ठोस उपाययोजना करा

अचानक आलेल्या वादळामुळे जिरोबा वस्तीत ओला व सुका कचरा घरांत पसरून अस्वच्छता व दुर्गंधीयुक्त वातावरण झाले. त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. याची नगर प्रशासनाने दखल घेऊन आरोग्य विषयक उपाययोजना करावी. तसेच वस्तीपासून दूर घनकचऱ्याची साठवण करून त्यावर प्रक्रिया करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात
वादळामुळे वस्तीत घनकचरा पसरल्याचे माहीत होताच स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कचरा गोळा केला. ज्या ठिकाणी घनकचऱ्याची डंपिंग करण्यात येते, ती जागा महसूल विभागाची आहे. या जागेवर डंपिंगच्या सोयीसुविधा व कंपाउंड करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविला आहे. तो मंजूर होताच सर्व कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जाईल.
- सौरव कावळे
मुख्याधिकारी, नगर पंचायत लाखांदूर.