esakal | संत समुदायाने दिला सरकारला निर्वाणीचा इशारा; काय म्हणाले जितेंद्रनाथ महाराज
sakal

बोलून बातमी शोधा

संत समुदायाचा सरकारला इशारा; काय म्हणाले जितेंद्रनाथ महाराज

संत समुदायाचा सरकारला इशारा; काय म्हणाले जितेंद्रनाथ महाराज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : कोरोनाच्या नावाखाली वारकऱ्यांना पंढरपूरला जाण्यास मज्जाव करून सरकार ब्रिटिशांच्या राजवटीचे दर्शन घडवत आहे. वारकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये; अन्यथा लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होतील. होणाऱ्या परिणामाला सर्वस्वी सरकारच जबाबदार राहील, असा निर्वाणीचा इशारा अंजनगावसुर्जी येथील देवनाथ मठाचे पीठाधीश्वर जितेंद्रनाथ महाराज तसेच वारकरी संप्रदायातील पदाधिकाऱ्यांनी सरकारला दिला. (Jitendranath-Maharaj-said-that-do-not-see-the-end-of-tolerance-of-Warakaris-nad86)

जितेंद्रनाथ महाराज म्हणाले, ‘‘केवळ पंढरपूरवारीच्या वेळीच सरकारला कोरोना आठवतो का? मंत्र्यांचे दौरे, राजकीय कार्यक्रमांच्या वेळी कुणाच्या आरटीपीसीआर चाचण्या केल्या जातात? वारकऱ्यांना चाचणीच्या नावाखाली त्रास दिला जात असून त्यांना पंढरपूरपासून दूर रोखण्यात येत आहे. आजच्या परिस्थितीत पब, बार, रेस्टॉरंट, लग्नसमारंभ, थिएटर्स सारेकाही अनलॉक झाले असताना विठ्ठलाचे मंदिर बंदिस्त करून ठेवून सरकारने वारकरी तसेच हिंदू समूहाच्या जखमेवर मीठ चोळले आहे. आषाढी महिन्यात सरकारने आषाढी पर्व जाहीर करून सर्व दिंड्यांना पंढरपुरात सन्मानासह प्रवेश द्यावा, अशी मागणी शासनाकडे केली आहे. मागणीची दखल न घेतल्यास वारकरी संप्रदायासह विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे कार्यकर्ते पंढरपूरकडे कूच करतील.’’

हेही वाचा: नागपुरात तिसऱ्या लाटेला जल्लोषात निमंत्रण! प्रेमीयुगुलांची पार्टी

७५० वर्षांच्या वारकरी परंपरेला सरकार कोरोनाच्या जाचक अटींखाली नेस्तनाबूत करीत आहे. मात्र, त्यांचा हा प्रयत्न आम्ही हाणून पाडणार, असा निर्धारही जितेंद्रनाथ महाराज यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेला विहिंपचे प्रांतमंत्री गोविंद मंत्री, जिल्हाध्यक्ष अनिल साहू, महानगर अध्यक्ष दिनेश सिंग, गुरुदेव सेवामंडळाचे सरचिटणीस जनार्दन बोथे, वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष श्यामबाबा निचत, प्रा. दिनेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

शनिवारी विदर्भात आंदोलन

कोरोनाच्या नियमांसह नोंदणीकृत दिंड्यांना पंढरपुरात प्रवेश देण्यात यावा, या मागणीसाठी शनिवारी (ता. १७) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संत समुदाय व वारकऱ्यांसह भजन आंदोलन करण्यात येणार आहे. तालुकास्तरावर तसेच विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये याच दिवशी भजन आंदोलन करण्यात येणार आहे.

(Jitendranath-Maharaj-said-that-do-not-see-the-end-of-tolerance-of-Warakaris-nad86)

loading image