एका विद्यार्थ्यासाठी २० हजार!

Sakal-Exclusive
Sakal-Exclusive

नागपूर - शहरात बड्या खासगी शिकवणी वर्गांची मक्तेदारी चांगलीच वाढली असल्याचे चित्र आहे. आपल्या प्रसिद्धीचा फायदा घेत, या शिकवणी वर्गाद्वारे कनिष्ठ महाविद्यालयांची लूट करण्यात येत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रवेशामागे ५ ते २० हजार रुपयांचे कमिशन घेण्यात  येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा गोरखधंदा सर्रासपणे सुरू असून शिक्षण विभाग जाणीवपूर्वक धृतराष्ट्र झाल्याचे दिसून येत आहे. 

अकरावीमध्ये प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयांकडून खासगी शिकवणी वर्गाच्या पायऱ्या झिजविण्यात येत असल्याचे दिसून येते. मात्र, प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी विशिष्ट शुल्क निर्धारित केले जात आहे. हे शुल्क देऊ शकणाऱ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची निश्‍चिती केल्या जात आहे. त्यासाठी शहरातील नामवंत खासगी शिकवणी वर्गाच्या माध्यमातून शाळांची तपासणी करण्यात येते. शिवाय त्यांच्याकडे अभ्यासक्रमांचे  शुल्कही तपासण्यात येते. प्रवेश शुल्क २० किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास त्या कनिष्ठ महाविद्यालयाची निवड केली जाते.

विशेष म्हणजे सीबीएसई दहावीचा निकाल लागल्यावरच या प्रक्रियेस सुरुवात झाल्याचे समजते. त्यामुळे अकरावीत सीबीएसई शाळांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची अडवणूक करून त्यांच्या पाल्यांना नाइलाजाने ठरविलेल्या शाळांमध्येच प्रवेश दिला जातो आहे. त्यासाठी शहरातील दोन सीबीएसई शाळांची खासगी शिकवणी वर्गाकडून निवड करण्यात आली आहे. यापैकी एक शाळा कळमेश्‍वर मार्गावर असल्याचे समजते. यापैकी एका शाळेत जवळपास हजारावर प्रवेश झाल्याचे समजते. 

दुसरीकडे बोर्डाचा दहावीचा निकाल अद्याप लागायचा असला तरी, विद्यार्थ्यांचे प्रवेश कोणत्या कनिष्ठ महाविद्यालयात घ्यायचे हे शिकवणी वर्गाकडून ठरविण्यात आले आहे. मात्र, सीबीएसईच्या तुलनेत बोर्डाशी संलग्नित असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांसाठी ५ ते १० हजार रुपये कमिशन आकारण्यात आले असल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com