कनक रिसोर्सेसचे पाय आणखी खोलात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

नागपूर : घराघरांतून कचऱ्याची उचल करणाऱ्या कनक रिसोर्सेसने महापालिकेकडून अतिरिक्त 24 कोटी वसूल केले होते. ऑडिटमध्ये यावर ठपका ठेवल्यानंतर महापालिकेने ही रक्कम वसूल करण्यास सुरुवात केली होती. दर महिन्याला देय रकमेतून महापालिकेने कपात केली. मात्र, कपात केलेली रक्कम परत घेण्यासाठी कनकने महापालिकेकडे तगादा लावला. याप्रकरणी नियुक्त केलेल्या आर्बिट्रेटरने कनकचा 21.28 कोटींचा दावा फेटाळून लावला. यामुळे कनकचे पाय आणखी खोलात गेले आहे.

महापालिकेने घराघरांतून कचरा गोळा करून भांडेवाडी येथील डम्पिंग यार्डमध्ये पोहोचविण्याचे कंत्राट कनक रिसोर्सेसला 2008 मध्ये दिले होते. महापालिकेने 10 वर्षांसाठी कनक रिर्सोसेससोबत करार केला होता. हा करार संपुष्टात आला असून, नव्या कंपन्यांच्या नियुक्तीपर्यंत कनकला मुदतवाढ देण्यात आली. कनक रिसोर्सेसने मार्च 2016 पर्यंत महापालिकेकडून प्रतिटन कचऱ्यामागे 1033.68 रुपये दराने वसुली केली. मात्र, एप्रिल 2016 मध्ये कनकने 1,606 रुपये प्रतिटन दराने बिले सादर केली. यासाठी कनकने राज्य शासनाने कर्मचाऱ्यांना देय किमान वेतन वाढविल्याने प्रतिटन दर वाढविल्याचे कारण पुढे केले.
दरम्यान, कनकने जुलै 2012 ते मार्च 2013 या काळात 47 लाख 49 हजार 838 रुपये अतिरिक्त उचलल्याचा निरीक्षण ऑडिटमध्ये नोंदविले होते. याशिवाय दर तीन महिन्यांनी कचऱ्याचे प्रतिटन दर सुधारण्यावरही ऑडिटमध्ये हरकत घेतली होती. त्यानंतर महापालिकेने 1,306 रुपये प्रतिटन दर निश्‍चित केले. यावर कनकनेही शिक्कामोर्तब केले. त्यामुळे कनकला 24.60 कोटी अतिरिक्त दिल्याचे महापालिकेच्या लक्षात आले. महापालिकेने कनककडून प्रति महिन्याला 1.42 कोटी वसूल करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेने कनककडून 13.02 कोटी वसूल केले. कनककडून एकूण वसूल करण्यात येणाऱ्या रकमेच्या तुलनेत ही रक्कम फारच कमी असल्याचे मत नोंदवित आर्बिट्रेटर चव्हाण यांनी कनकने आता महापालिकेकडून कुठल्याही वसुलीची अपेक्षा ठेऊ नये, असा निकाल दिला. महापालिका दोन नव्या एजन्सी नियुक्त करणार असून, अटी व शर्तीनुसार कचरा उचलण्यासाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेत भाग घेण्यास अपात्र ठरणार आहे. याप्रकरणात महापालिकेकडून ऍड. ए. एम. काजी यांनी युक्तिवाद केला. त्यांना अकाउंटंट देवेंद्र इंदूरकर, मनपाचे विधी अधिकारी व्यंकटेश कपले, सहायक विधी अधिकारी ऍड. राहुल झांबरे, सहायक विधी अधिकारी ऍड. प्रकाश बरडे यांनी सहकार्य केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kanak Resource news