वाहनचालकांनो... वाहनांची कागदपत्रे ठेवा मोबाईलमध्ये 

वाहनचालकांनो... वाहनांची कागदपत्रे ठेवा मोबाईलमध्ये 

नागपूर - शहरात वाहतूक पोलिस नाकाबंदी करतात. वाहनचालकांना ड्रायव्हिंग लायसन्स, वाहनाची कागदपत्रे दाखविण्याची सक्‍ती करतात. अन्यथा, अव्वाच्या सव्वा असलेली दंडाची पावती देतात. आता या खटाटोपातून सुटका मिळाली आहे. मोबाईलमध्ये शासनाचे "डिजीलॉकर' हे ऍप डाउनलोड करा आणि ऍपमध्ये वाहनांची कागदपत्रे आणि ड्रायव्हिंग लायसन्सची फोटो काढून ठेवा. मोबाईलमधील ही कागदपत्रे दाखविल्यास वाहतूक पोलिस ग्राह्य धरतील आणि तुमचे वाहन सोडून देतील. 

केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमातून अनेक गोष्टी ऑनलाइन झाल्या आहेत. यातूनच वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी आणि पोलिस आणि वाहनचालकांचा वेळ वाचावा, या उद्देशातून डिजीलॉकर ऍपची सुरुवात झाली. या ऍपमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (आरसी बूक) पीयूसी आणि अन्य परवाने अपलोड करू शकतो. शासनाच्या विविध यंत्रणाकडून हे ऑनलाइन डाक्‍युमेंट ग्राह्य धरल्या जातात. त्यामुळे वाहनचालकांना आता लायसन्स हरविल्याची किंवा घरी विसरल्याची चिंता मिटणार आहे. वाहतूक पोलिसांनी वाहन अडविल्यास चालकाने मोबाईलमध्येच सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्र दाखवणे गरजेचे आहे. या सुविधेमुळे पोलिस आणि वाहनचालकांचा वेळही वाचेल तसेच रस्त्यावर वाहने थांबवून वाहतुकीस अडथळाही निर्माण होणार नाही. 

अनेक कर्मचारी अनभिज्ञ 
केंद्र शासनाचे "डिजीलॉकर ऍप' वाहनांची कागदपत्रे आणि ड्रायव्हिंग लायसन्स ग्राह्य मानल्या जातात, याबाबत अनेक पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये अनभिज्ञता आहे. त्यामुळे वाहतूक शाखेने कर्मचाऱ्यांना शिक्षण-प्रशिक्षण देण्याची गरज आहे. जेणेकरून वाहनचालकांना पोलिसांची मनमानी आणि अरेरावीची भाषा सहन करावी लागणार नाही. 

डिजीलॉकर ऍपमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स आणि अन्य कागदपत्रे ठेवावे. वाहन चालकांना वाहतूक पोलिसांनी कागदपत्रांची मागणी केल्यास मोबाईलमधून ते दाखवावे. आरसी बुक आणि ड्रायव्हिंग लायसन्स वाहतूक पोलिस ग्राह्य धरतील. 
- राजतिलक रौशन, वाहतूक पोलिस उपायुक्‍त. 

युवा वर्गासह अनेकांकडे स्मार्टफोन आहेत. त्याचा योग्यप्रमाणे वापर केल्यास ते उपयोगाचे ठरू शकतात. वाहनाची कागदपत्रे हरविल्यास, पाण्याने ओले झाल्यास किंवा फाटल्यास ते ग्राह्य मानण्यास पोलिस तयार होत नाही. त्यामुळे डिजीलॉकर ऍप संजीवनी ठरले आहे. शासनाने अनेक व्यवहार ऑनलाइन केले असल्यामुळे डिजिटलचे पुढचे पाऊल म्हणजे डिजीलॉकर ऍप ठरत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com