Kerosene
Kerosene

केरोसीन परवानाधारकांवर उपासमारीची वेळ

नागपूर - दिवसेंदिवस केरोसीन वापरकर्त्या ग्राहकांची संख्या कमी होत असून राज्यातील ६७ हजार केरोसीन परवानाधारकांवर उपासमारीची वेळ आली आहे. प्रतिलिटर केवळ २३ पैसे कमिशनवर काम करणाऱ्या परवानाधारकांना महिन्याला सरासरी ७०० लिटर केरोसीन वितरणासाठी देण्यात येत असून महिन्याकाठी दोनशेही कमाई नसल्याने परवानाधारकांना मजुरीची कामे करावी लागत आहेत. 

एकेकाळी केरोसीनच्या वितरकांना बरे दिवस होते. मात्र, सरकारने त्यांच्या कमिशनमध्ये वाढ केली नाहीच, शिवाय गॅस सिलिंडरच्या वापरामुळेही त्यांच्यावर संक्रांत आली आहे. राज्यात ६७ हजार केरोसीन परवानाधारक असून नागपुरात साडेसहाशे आहेत. प्रति परवानाधारक सरासरी सातशे लिटर केरोसीन ग्राहकांना वितरणासाठी दिले जाते. यातून या परवानाधारकांना कमिशनपोटी महिन्याला १६१ रुपयेच मिळत आहेत. त्यातूनही ग्राहकांपर्यंत केरोसीन पोहोचविण्यासाठी तसेच रजिस्ट्रर नोंदणीसाठी त्यांना दोनशे रुपयांपेक्षा जास्त खर्च येत आहे. त्यामुळे केरोसीनचा परवाना आता पांढरा हत्ती ठरला आहे. यातील काही जणांकडे स्वस्त धान्य दुकान असल्याने त्यांचे फावले. मात्र, ज्यांच्याकडे स्वस्त धान्य दुकाने नाहीत, असे परवानाधारक आता मजुरीची कामे करीत असल्याचे चित्र आहे. कमिशन नावालाच मिळत असून आता ग्राहकांकडून हमीपत्र घेण्यासाठी वेळ काढणे म्हणजे मजुरीवरही टाच आणून उपाशी मारण्याचा हा प्रकार नाही काय? असा सवाल महाराष्ट्र केरोसीन हॉकर्स, रिटेलर्स असोसिएशनने केला आहे. 

गॅस कंपन्यांच्या मते, साडेपाच लाख कुटुंबांकडे एकच सिलिंडर आहे तर अन्न नागरी पुरवठा विभागाच्या मते अशी साडेतीन लाख कुटुंबे आहेत.

हमीपत्र न दिल्यास कारवाई 
केवळ एकच सिलिंडर असलेल्या ग्राहकांना प्रतिमहिना तीन लिटर केरोसीन देण्यात येते. आता ग्राहकांना एकच सिलिंडर असल्याबाबत हमीपत्र भरून द्यावे लागणार आहे. हमीपत्रानंतर दोन सिलिंडर आढळून आल्यास जीवनावश्‍यक वस्तू अधिनियमाप्रमाणे कारवाई केली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com