खामगाव जिल्ह्याचे काय झाले?

श्रीधर ढगे
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

खामगाव : गेल्या कित्येक वर्षांपासून खामगाव जिल्हानिर्मितीचा प्रश्‍न हा रखडलेलाच आहे. पाच वर्षांआधी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खामगाव येथे आले असता त्यांनी खामगाव संबंधित असलेल्या दोन-तीन प्रश्‍नांना हात घातला होता. त्यामध्ये कॉंग्रेसच्या कार्यकाळात खामगाव जिल्हा झाला का? असा प्रश्‍न त्यांनी भरसभेत विचारला आणि जमलेल्या जनसमुदायानेदेखील तितक्‍याच तीव्रतेने उत्तर दिले....नाही. पंतप्रधान मोदी यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधल्याने खामगाव जिल्हा झाल्याशिवाय राहणार नाही अशी आशा जनतेला लागली आहे.

खामगाव : गेल्या कित्येक वर्षांपासून खामगाव जिल्हानिर्मितीचा प्रश्‍न हा रखडलेलाच आहे. पाच वर्षांआधी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खामगाव येथे आले असता त्यांनी खामगाव संबंधित असलेल्या दोन-तीन प्रश्‍नांना हात घातला होता. त्यामध्ये कॉंग्रेसच्या कार्यकाळात खामगाव जिल्हा झाला का? असा प्रश्‍न त्यांनी भरसभेत विचारला आणि जमलेल्या जनसमुदायानेदेखील तितक्‍याच तीव्रतेने उत्तर दिले....नाही. पंतप्रधान मोदी यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधल्याने खामगाव जिल्हा झाल्याशिवाय राहणार नाही अशी आशा जनतेला लागली आहे. मात्र, आता सरकारचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यासाठी केवळ दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. यावेळीही तेच आश्‍वासन पुन्हा दिले जाईल व पुन्हा घाटाखालील जनतेची उपेक्षाच होणार की, काय? असा प्रश्‍न पडला आहे.
बुलडाणा जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे 9680 चौ. किमी इतके आहे. तर बुलडाणा, चिखली, मेहकर, लोणार, मोताळा, सिंदखेडराजा, देऊळगावराजा, खामगाव, नांदुरा, मलकापूर, जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव असे 13 तालुके यामध्ये समाविष्ट आहेत. यापैकी सात तालुके घाटावर व सहा तालुके घाटाखाली येतात. यामध्ये खामगाव हे जिल्ह्यातील सर्वांत जास्त लोकसंख्येचे शहर असून, घाटाखालील मध्यवर्ती ठिकाणी आहे तसेच सर्व गावांसाठी केवळ 50 किमी अंतरावर आहे. त्यामुळे घाटाखालील सहा तालुके मिळून खामगाव जिल्ह्याची निर्मिती करावी अशी मागणी जनतेकडून गेल्या कित्येक वर्षांपासून होत आहे. बुलडाणा जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे विस्तीर्ण असल्याने घाटाखालील सगळ्यात शेवटच्या टोकावर असलेल्या संग्रामपूर, जळगाव जामोद, मलकापूर या तालुक्‍यांतील नागरिकांना जिल्हा कचेरीशी संबंधित कोणत्याही कामासाठी थेट 100 ते 120 किलोमीटरचा प्रवास करून बुलडाणा गाठावे लागते. आधीच मागासलेपणाचे शिक्‍का लागून असलेल्या या भागात आदिवासीबहुल भागसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे संग्रामपूर व जळगाव (जा.) तालुक्‍यातील अनेक आदिवासी बांधवांना तर आपल्या जिल्ह्याचे मुख्यालय कोणते? हेसुद्धा माहिती नसल्याचे अनेकदा पुढे येते. त्यामुळे मागील निवडणुकीत पंतप्रधानांनीच दिलेले आश्‍वासन केव्हा पूर्ण होईल याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.
जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते राज्याचे कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांचा 2016 मध्ये राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्याने आता खामगाव जिल्हा निर्मितीबाबत भाऊसाहेब सरकार दरबारी पाठपुरावा करतील व खामगाव जिल्हानिर्मितीचा प्रश्‍न मार्गी लागेल अशा अपेक्षा जनतेला होती. परंतु, दुर्दैवाने दीड वर्षाच्या काळातच भाऊसाहेबांचे निधन झाले. त्यामुळे जिल्हानिर्मितीच्या आशा पुन्हा मावळल्या होत्या. परंतु, आता जिल्ह्यातीलच आमदार संजय कुटे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने ते खामगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्‍न मार्गी लावतील का? हे येणारा काळच सांगेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: khamgaon district issue is still pending