esakal | खामगाव : यंदाही कुलूप बंद दारातून लाकडी गणपतीचे दर्शन
sakal

बोलून बातमी शोधा

ganpati

खामगाव : यंदाही कुलूप बंद दारातून लाकडी गणपतीचे दर्शन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खामगाव : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सरकारने लावलेल्या निर्बंधांमुळे यंदाही अय्याची कोठी भागातील मानाच्या लाकडी गणपतीचे दर्शन भक्तांना कुलूप बंद दारातून घ्यावे लागत आहे. मागील दोन वर्षांपासून हे मंदिर कुलूप बंद आहे. यंदा १० सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी मंदिराचे पुजारी धीरज पुरोहित यांच्या हस्ते गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली.

ही मूर्ती अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जित करण्यात येणार आहे. या मंदिरातील गणपतीची मूर्ती ही जवळपास सहा फुट उंचीची आहे. सुमारे १५० वर्षापूर्वी अय्या (स्वयंपाकी) या लोकांनी लाकडी गणपतीची स्थापना केली होती. ही संपूर्ण मुर्ती लाकडापासून तयार केली आहे. गणेशोत्सव काळात या मंदिर परिसरात भाविकांची गर्दी दिसून येते. नवसाला पावणारा हा गणपती असल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून भक्त मिळेल त्या वाहनाने या मंदीरात येतात. परंतु, मागील दोन वर्षापासून या मंदिरात दर्शनासाठी बाहेरगावाहून येणाऱ्या भक्तांची संख्या कमी झाली आहे.

हेही वाचा: आमदार साहेब, मुली पटत नाहीत थोडं बघा ना : पत्र व्हायरल

सकाळपासूनच भक्तांची दर्शनासाठी रीघ लागलेली असते. परंतु, यंदा तसे चित्र दिसून आले नाही. नवसाला पावणारा हा गणपती असल्याने अनेक भाविक या मंदीरात येऊन गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन नवस बोलतात. त्यानंतर हा नवस पूर्ण झाल्यानंतर फेडण्यासाठी या मंदिरात येतात. शेकडो वर्षापूर्वी शहरात कापसाची बाजारपेठ होती. यावेळी दूरदूरचे कापसाचे व्यापारी या ठिकाणी कापसाची खरेदी करण्यासाठी येत होते. दरम्यान याच काळात अय्याची लोक येथे काम करीत होते. या अय्याची लोकांनी या मूर्तीची स्थापना केली असल्याचा इतिहास आहे. अय्या लोक या भागात राहत असल्याने व तेथे त्यांनी मूर्तीची स्थापना केल्याने हा परिसर अय्याची कोठी म्हणून आजही ओळखला जातो.

हेही वाचा: बाह्यरुग्ण बंद असताना एंजिओप्लास्टी; डॉक्टरांनी मरणाच्या दारातून काढले बाहेर

या मंदिराचा १९९६-९७ मध्ये जिर्णोध्दार करुन नवीन वास्तू बांधण्यात आली. शहराच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत लाकडी गणपतीला मानाचे स्थान आहे. जोपर्यंत लाकडी गणपती फरशीवर येत नाही व तेथून पुढे मार्गक्रमण करीत नाही, तोपर्यंत विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होत नाही. ही प्रथा गेल्या अनेक वर्षापासून आजतगायत सुरु आहे. लाकडी गणपती नंतरच शहरातील अन्य मंडळे आपापल्या क्रमानुसार विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात.

विसर्जन मिरवणुकीच्या वेळी सजविलेल्या रथात लाकडी गणपतीची मुर्ती ठेवण्यात येते. मिरवणुकीनंतर पुन्हा लाकडी गणपतीची मूर्ती मंदिरात स्थापन करण्यात येते. लाकडी गणपतीच्या अंगावर लाखो रुपयांचे अलंकार आहेत. यापैकी काही अलंकार दान स्वरुपात आले आहे. तर या मंदिरात पुजारी म्हणून धीरज पुरोहित हे काम पाहत आहेत. भाविक भक्तांनी बाहेरूनच गणपतीचे दर्शन घ्यावे. तसेच मंदिरात दर्शनासाठी भक्तांनी गर्दी करू नये, असे आवाहन विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

loading image
go to top