esakal | बाह्यरुग्ण बंद असताना एंजिओप्लास्टी; डॉक्टरांनी रुग्णाला मरणाच्या दारातून काढले बाहेर
sakal

बोलून बातमी शोधा

बाह्यरुग्ण बंद असताना एंजिओप्लास्टी; डॉक्टरांनी मरणाच्या दारातून काढले बाहेर

बाह्यरुग्ण बंद असताना एंजिओप्लास्टी; डॉक्टरांनी मरणाच्या दारातून काढले बाहेर

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : सरकारी आरोग्य यंत्रणेचा सगळा व्याप कोरोनाभोवती (coronavirus) सुरू आहे. कोरोना निगेटिव्ह असेल तरच शस्त्रक्रिया (Surgery) करण्यात येते. त्यात खासगी आरोग्य सेवेची दारे संकटकाळात अशक्यप्राय झाली आहेत. अशावेळी गरिबांसाठी मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच (Super Specialty Hospital) आहे. मात्र, येथेही सरकारी काम अन् उपचारासाठी महिनोमहिने थांब, असे अनुभव असताना सुपरच्या हृदयरोग विभागात ५५ वर्षीय व्यक्तीच्या हृदयात १०० टक्के ब्लॉकेज असताना कोणतेही कागदी घोडे न नाचवता थेट उपचाराला सुरवात केली. अवघ्या तासाभरात एंजिओग्राफीसह एंजिओप्लास्टी करण्यात आली. अखेर या व्यक्तींचा जीव वाचविण्यात सुपरच्या हृयविभागातील डॉक्टरांना यश आले. (Angioplasty when outpatient closed in medical hospital)

कोरोनाच्या रिपोर्टशिवाय ज्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली त्या रुग्णाचे नाव सिद्धार्थ. हृदयातील सर्व शिरा बंद पडल्याने अर्धमेल्या अवस्थेत सुपरच्या प्रवेशद्वारावर आणले. मात्र, हृदयरोग विभागाचा बाह्यरुग्ण विभाग त्या दिवशी नसल्याने त्यांना मरणाच्या दारातून बाहेर काढणे कठीण. मात्र वैद्यकीय पवित्र व्यवसायाचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी या विभागातील डॉक्टरांनी सांभाळली.

हेही वाचा: चंद्रशेखर बावनकुळे अचानक मौनात! राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा

कोणतेही कार्ड न काढता, प्रारंभी येथील डॉ. अतुल, डॉ. सुरेश यांना माजी विभागप्रमुख तसेच सध्या मानसेवी तत्त्वावर कार्यरत डॉ. मुकुंद देशपांडे यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करीत रुग्णाला स्थिर केले. यानंतर डॉ. देशपांडे यांनी एंजिओग्राफी केली. १०० टक्के हृदयाच्या शिरा ब्लॉकेज होत्या. तत्काळ महात्मा फुले जनआरोग्य विभागातील प्रतिनिधींशी मोबाईलवरून चर्चा करून या रुग्णावर तासाभरात ऍन्जिओप्लास्टची गरज असल्याने मोबाईलवरूनच ही केस मंजूर करावी अशी सूचना केली.

मंजुरी मिळताच तत्काळ डॉ. मुकुंद देशपांडे, विभागप्रमुख डॉ. पी.पी. देशमुख, सहयोगी प्राध्यापक डॉ. सुनील वाशिमकर यांच्यासह डॉ. सुरेश, डॉ. अतुल यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळेच सिद्धार्थ यांना सुपरमध्ये नवीन जीवनदान मिळाले. नातेवाइकांनी हृदयरोग विभागातील प्रत्येकाचे हात जोडून आभार मानले.

हेही वाचा: वडिलांच्या कोरोना मृत्यूने पोरं झाली पोरकी; सर्वांचे डोळे पाणावले

हृदयरोग विभागात अडिचशेवर प्रोसिजर्स

सुपरच्या हृदयरोग शल्यक्रिया विभागापासून ते मेंदूरोग, गॅस्ट्रो इंट्रॉलॉजी विभागात दररोज रुग्णांशी निगडित प्रोसिजर्स आजही सुरू असल्याचे समाधानकारक चित्र आहे. सुपरमधील हृदयरोग विभागात आठवड्यातून किमान ७ ते ८ जणांच्या तरी हृदयावर एंजिओप्लॉस्टी होतात. यापैकी अनेक रुग्ण रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्याने मृत्यूच्या दारात पोचले असतात. त्यामुळे त्यांच्यापैकी काही जणांची ओपन हार्ट तर काही जणांवर बायपास शल्यक्रिया करून रक्तवाहिन्यांमधील अवरोध दूर करण्यात सुपरच्या रुग्ण सेवेत वाहून घेतलेल्या डॉक्टरांनी यश मिळविले. कोरोना काळातही कोविडचा प्रकोप सुरू असताना सुपरच्या हृदयरोग शल्यक्रिया विभागाने कुठलाही गाजावाजा न करता अडिचशेवर हृदयावर प्रोसिजर्स, शल्यक्रिया केल्या आहेत. कार्डिऑलॉजी विभागाने १०० रुग्णांच्या हृदयातील मुख्य रक्तवाहिन्यांमधील अवरोध दूर करून त्यांना जीवनदान दिले आहे.

(Angioplasty when outpatient closed in medical hospital)

loading image
go to top