खारघर पाळणाघरप्रकरणी पोलिस अधिकारी निलंबित

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 18 डिसेंबर 2016

नागपूर - नवी मुंबई खारघर सेक्‍टर दहामधील पूर्वा डे-केअर प्ले स्कूल या पाळणाघरात दहा महिन्यांच्या बाळाला अमानुष मारहाण झाल्याच्या प्रकरणाची चौकशी करताना कर्तव्यात कसूर केल्यावरून तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यास निलंबित केले जाईल, अशी घोषणा गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शुक्रवारी येथे केली.

विधानसभेत आज कामकाज सुरू झाल्यावर लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून या प्रकरणास वाचा फोडण्याचा प्रयत्न प्रशांत ठाकूर, ऍड. आशिष शेलार आदींनी केला. ठाकूर म्हणाले, की राज्यातील सर्व पाळणाघरांत सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजेत. तसेच मुलांचे संगोपन करणाऱ्या संस्थांतील कर्मचाऱ्यांना वर्तणूक प्रमाणपत्र सक्‍तीचे केले पाहिजे. त्यांना अद्ययावत प्रशिक्षण दिले पाहिजे. याची अमंलबजावणी केली, तरच यासारखे प्रकार घडणार नाहीत. या प्रकरणाची "सीआयडी'मार्फत चौकशी होणे गरजेचे आहे, असे शेलार म्हणाले. बहुतांश सदस्यांनी कर्तव्यावर असलेल्या तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यास निलंबित करण्याची मागणी उचलून धरली. त्यावर डॉ. पाटील यांनी तशी घोषणा केली.

या घोषणनेनंतर महिला सदस्य भारती लव्हेकर यांनी यांनी सरकारच्या वतीने पाळणाघरे, वृद्धाश्रम यांची उभारणी करावी, अशी मागणी केली. दरम्यान, महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे या सदनात अवतरल्या. त्या उत्तर देताना म्हणाल्या, की अशाप्रकारे सरकारी पातळीवर विचारविनिमय सुरू आहे. राज्यभरातील पाळणाघरे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी सुसज्ज करण्याचे सरकारचे धोरण आहे.

Web Title: Kharghar police officers suspended in daycare