खुशीला मारणाऱ्या अश्रफने लपविला जॅक?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जुलै 2019

सपूर्ण जिल्ह्यात चर्चेत असलेल्या खुशी परिहार हत्याकांडात केळवद पोलिसांनी आरोपी अश्रफ अफसर शेख (वय २१, रा, जाफरनगर) याची कार जप्त केली. गाडीतून रक्ताचे नमुने घेत ते तपासणीला पाठविले आहेत. मात्र, जॅकच्या लोखंडी रॉडने मारून खुशीचा खून करण्यात आला तो रॉड सापडला नाही. तो आरोपीने लपविला असावा, असा पोलिसांचा संशय आहे.

केळवद -  सपूर्ण जिल्ह्यात चर्चेत असलेल्या खुशी परिहार हत्याकांडात केळवद पोलिसांनी आरोपी अश्रफ अफसर शेख (वय २१, रा, जाफरनगर) याची कार जप्त केली. गाडीतून रक्ताचे नमुने घेत ते तपासणीला पाठविले आहेत. मात्र, जॅकच्या लोखंडी रॉडने मारून खुशीचा खून करण्यात आला तो रॉड सापडला नाही. तो आरोपीने लपविला असावा, असा पोलिसांचा संशय आहे.

केळवद पोलिसांनी सोमवारी आरोपीला चौकशीसाठी नागपुरात आणले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्रफसोबत ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहणारी खुशी परिहार हिचा खून करण्याअगोदर ज्या वाहनात खुशी आणि तिचा प्रेमी आरोपी अश्रफ शेख हे कारमधून ‘लाँग ड्राइव्ह’वर गेले होती ती जप्त केली. याच कारच्या जॅकच्या रॉडने खुशीचा खून केला तो मात्र सापडला नाही. पोलिसांनी कारमधील रक्ताच्या डागाचे नमुने फॉरेन्सिक लॅबला तपासणीसाठी पाठविले.

आरोपी अश्रफ शेख व खुशी त्याच दिवशी नागपूर शहरातील बिग बाजार तसेच गिट्टीखदान परिसरातील एक पेट्रोल पंप, तसेच कळमेश्‍वर व सावनेर तालुक्‍यातील शहर आणि ग्रामीण भागात ज्या-ज्या ठिकाणी दोघेही गेले होते, त्या सर्व ठिकाणी आरोपी अश्रफ याला नेण्यात आले. त्या बहुतांश ठिकाणचे सीसीटीव्ही केळवद पोलिसांनी तपासले आहेत. वृत्त लिहिस्तोवर केळवद पोलिसांचा तपास सुरू होता. केळवदचे ठाणेदार सुरेश मट्टामी, पोलिस उपनिरीक्षक अनिल देरकर, शिपाई राजू रेवतकर, रवींद्र चटप हे तपास पथकात सामील आहेत. 

खुशी परिहारच्या खूनप्रकरणी आम्ही आरोपीला विचारपूस करून भक्कम पुरावे गोळा केले आहेत. सांगितलेल्या सर्व बाबींची खातरजमा करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेतला असून तेदेखील पुरावे ठरतील. आरोपी अश्रफ याच्याविरोधात भक्कम पुरावे आम्ही न्यायालयात सादर करणार आहोत. 
- सुरेश मट्टामी, ठाणेदार, केळवद


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: khushi parihar murder case