मुलाने केली एक कोटीची एफडी लंपास

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

नागपूर  : वृद्ध वडिलांचे निधन होताच मुलाने घरातील जवळपास एक कोटी रुपयांच्या मुदत ठेवपत्र (एफडी) लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार सोनेगाव पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आला आहे. या प्रकरणी आईनेच मुलाविरुद्ध तक्रार दिली आहे.

नागपूर  : वृद्ध वडिलांचे निधन होताच मुलाने घरातील जवळपास एक कोटी रुपयांच्या मुदत ठेवपत्र (एफडी) लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार सोनेगाव पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आला आहे. या प्रकरणी आईनेच मुलाविरुद्ध तक्रार दिली आहे.
हेमंत मदनलाल फुलसंगे असे आरोपी मुलाचे नाव आहे. या प्रकरणी उषाराणी मदनलाल फुलसंगे (67, रा. विनोबा ग्राम सोसायटी, इंद्रप्रस्थनगर) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, उषाराणी यांचे पती मदनलाल यांनी त्यांच्या नावाने बॅंक ऑफ इंडिया आणि सेंटल बॅंक ऑफ इंडियांच्या शाखांमध्ये 11 वेगवेगळ्या मुदत ठेवी (एफडी) केल्या होत्या. या ठेवींचे दस्तावेज उषाराणी यांच्या ताब्यात होते. दरम्यान, त्यांच्या पतीची तब्येत बिघडल्याने त्यांना रामदासपेठ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 10 ऑक्‍टोबर ते 24 ऑक्‍टोबर 2018 या कालावधीमध्ये वडील रुग्णालयात असताना आरोपीने आईच्या कपाटातील मुदत ठेवीचे दस्तावेज चोरले. वडिलांच्या मृत्यूनंतर मुदत ठेवीचे पत्र व मृत्युपत्र घेऊन आरोपीने बॅंकेत जाऊन ते आपल्या नावाने वर्ग करण्याची विनंती केली. आता उषाराणी यांनी दस्तावेज शोधले असता ते चोरीला गेल्याचे समजले. त्यांनी मुलाकडे दस्तावेज मागितले असता त्याने परत करण्यास नकार दिला. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The kid made a million FD lumps