किशोर जिचकार यांनाच 'स्वीकृती' मिळणार!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

नागपूर - महापालिकेतील कॉंग्रेसच्या वर्तुळात घडलेल्या घडामोडी तसेच अचानक गटनेता बदलल्याने स्वीकृत सदस्य म्हणून किशोर जिचकार यांचीच नियुक्ती होणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. तसे संकेतही अधिकारी आणि कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून दिले जात आहे. नेता बदलास न्यायालयात आव्हान दिले जाणार आहे. आता महाकाळकर आणि ठाकरे यांचे भवितव्य कोर्टाच्या आदेशावर अवलंबून राहणार आहे.

महापालिकेत कॉंग्रेसचे संख्याबळ 29 नगरसेवकांचे आहे. कोट्यानुसार कॉंग्रेसला फक्त एकाच उमेदवाराला स्वीकृत सदस्य करता येते.

कॉंग्रेसचे गटनेते संजय महाकाळकर यांनी विकास ठाकरे आमचे उमेदवार असल्याचे पत्र महापालिकेकडे सोपविले तर तानाजी वनवे यांच्या गटातर्फे किशोर जिचकार यांचा अर्ज दाखल केला. पडताळणीत दोन्ही अर्ज वैध ठरविण्यात आले. यावर अंतिम निर्णय घेण्याची महापालिकेच्यावतीने विभागीय आयुक्तांना सूचना करण्यात आली होती. तत्पूर्वी तानाजी वनवे यांच्या नेतृत्वात एकूण 16 नगरसेवकांनी कॉंग्रेसचा गटनेता बदलवण्यात यावा, अशी मागणी विभागीय आयुक्तांकडे केली होती. बहुमताचा आधार घेऊन शुक्रवारी विभागीय आयुक्तांनी तानाजी वनवे यांना कॉंग्रेसचा गटनेता म्हणून जाहीर केले. आज वनवे यांनी पदभारसुद्धा स्वीकारला. स्वीकृत सदस्यांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 18 तारखेला पार पडली. त्या दिवशी महाकाळकर गटनेते होते. यामुळे ठाकरे यांचाच अर्ज वैध ठरेल, असा दावा मुत्तेमवार गटातर्फे आजही केला जात आहे. मात्र, विभागीय आयुक्तांनी 16 तारखेला झालेल्या कॉंग्रेसच्या बैठकीनुसार तानाजी वनवे यांना गटनेता करण्यात येत असल्याचा उल्लेख महापालिकेला पाठविल्याल्या पत्रात केला आहे. हा आधार घेऊन तानाजी वनवे यांनी सादर केलेला किशोर जिचकार यांचाच अर्ज वैध ठरविल्या जाईल असा प्रतिदावा केला जात आहे.

तानाजी वनवे यांना सोळा नगरसेवकांनी कॉंग्रेसच्या बैठकीत समर्थन दिले. बहुमत त्यांच्या बाजूने असल्याने त्याच दिवसापासून संजय महाकाळकर यांनी गटनेतेपदाचे अधिकार गमावले. म्हणूनच विभागीय आयुक्तांनी सोळा तारखेचा आपल्या आदेशात उल्लेख केला. याचा अर्थ उमेदवारी दाखल केली त्या दिवशी तानाजी वनवे हेच कॉंग्रेसचे गटनेते होते असाही युक्तिवाद केला जात आहे.

Web Title: kishor jichkar approved corporator