पक्षापेक्षा स्वतःच्या व्यक्तिमत्त्वावर देदीप्यमान कामगिरी करणारा नेता म्हणजे भारत भालके

Kishor Jorgewar said that Bharat Bhalkes career was inspiring
Kishor Jorgewar said that Bharat Bhalkes career was inspiring

नागपूर : कोरोना विषाणूच्या सावटामुळे नागपूरऐवजी मुंबईत आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. दोन दिवस हे अधिवेशन चालणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. सभेत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू असताना चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी शोक प्रस्तावावर चर्चेदरम्यान स्तुतीसुमने उधळली.

भारत नाना भालके यांनी पहिल्यांदा अपक्ष आणि नंतर दोन वेळा राष्ट्रीय पक्षांकडून अशी तीन वेळा निवडणूक लढली आणि जिंकले. प्रत्येक वेळी स्वतःच मताधिक्य त्यांनी सातत्याने वाढवले. पक्षापेक्षा स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाच्या भरवशावर त्यांनी देदीप्यमान कामगिरी केली. माझ्यासारख्या पहिल्यांदा सभागृहात आलेल्या सदस्यासाठी त्यांची कारकीर्द प्रेरणादायी आहे, आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

भारत नाना भालके यांच्या साध्या पण तितक्याच आकर्षक पेहरावामुळे ते नेहमीच लक्षात राहतात. ते अत्यंत साधे होते. पण, जनतेच्या प्रश्‍नांवर सभागृहात ते आक्रमक होत. तेव्हा त्यांना शांत करणेही अवघड होत असे. साखर कारखान्यांचे हमी भावाचे प्रश्‍न आणि पाण्याचे प्रश्‍न ते नेहमीच सभागृहात मांडत. हृदयविकाराचा आणि किडणीचा त्रास असतानाही आपल्या दुखण्यावर मात करून ते सभागृहात येत असत, असेही ते म्हणाले.

सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये ते निवडून आले होते. त्यांच्या अंत्यविधीला आलेला प्रचंड जनसमुदाय त्यांच्या कार्याची साक्ष देतो, असे आमदार जोरगेवार म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवारदेखील नानांच्या अंत्यसंस्काराला गेले होते. तेसुद्धा तेथे भावूक झाले होते. सर्व जण त्यांना नाना म्हणत होते. पण मी त्यांना भाभा (भारत भालके) म्हणत असे आणि त्यांनासुद्धा ते आवडायचे, अशी आठवण त्यांनी केली.

त्यांच्या घरी जेवायचे राहून गेले

मागच्या वर्षी पहिल्यांदाच सभागृहात आलो. त्या दिवसापासून भारत नाना भालकेंशी गट्टी जमली. मी नवीन म्हणून त्यांनी स्वतःहून मला विशेष मार्गदर्शन केले. त्यांची कारकीर्द माझ्यासारख्या पहिल्यांदा सभागृहात आलेल्या सदस्यांसाठी प्रेरणादायी आहे. मी त्यांच्याकडून नेहमी मार्गदर्शन घेत असे. त्यांनी मला त्यांच्या घरी जेवायलाही बोलावले होते. पण मी जायच्या आधीच ते निघून गेले. याची हुरहुर नेहमीच लागून राहणार आहे, असे चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

नानांना विसरणे अशक्यच

माझ्या मुलीचा विवाह झाला आहे आणि ती पंढरपूरलाच आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून नानांशी माझा जवळचा संबंध आला. मतदारसंघात त्यांचा वावर मी स्वतः बघितला आहे. अशा या भाभांना म्हणजेच नानांना विसरणे केवळ अशक्यच आहे. ते कायम आमच्या स्मरणात राहणार आहे, असेही जोरगेवार म्हणाले.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com