कोरंभीच्या नदीपात्रात आढळलेल्या मृतदेहाची पटली ओळख; प्रियकराच्या मदतीनं केला पतीचा खून

मुनेश्‍वर कुकडे
Saturday, 12 December 2020

कोरंभीदेवी येथील नदीपात्रात पोत्यात बांधलेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह आढळला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत जाधव यांनी घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, पोलिस ठाण्याचे पथक पाठवून तपासाच्या सूचना केल्या.

भंडारा ः कोरंभीदेवी येथील नदीपात्रात पोत्यात बांधलेल्या अवस्थेत आढळेल्या युवकाच्या मृत्यूचा अखेर उलगडा झाला असून, अनैतिक संबंधात अडथळा येत असल्याने पत्नीने तिच्या प्रियकरासह कट रचून पतीचा खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. नंदकिशोर सुरजलाल रहांगडाले (वय 34, रा. नवाटोला ता. गोरेगाव, जि.गोंदिया) असे मृताचे नाव आहे. भंडारा पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

कोरंभीदेवी येथील नदीपात्रात पोत्यात बांधलेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह आढळला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत जाधव यांनी घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, पोलिस ठाण्याचे पथक पाठवून तपासाच्या सूचना केल्या. तपासात मृतदेहाच्या पॅन्टच्या मागील खिशात मृत व त्याच्या पत्नीचे फोटो तसेच कागदपत्रे आढळली. यावरून मृताची ओळख पटली.

हेही वाचा -दानवे भैताड माणूस, वडेट्टीवारांची जीभ घसरली 

नंदकिशोर रहांगडाले हे नाव व गाव लक्षात येताच पथकाने नवाटोला गाव गाठले. तपासात पत्नी संशयाच्या भोवऱ्यात आली. त्यानंतर, गुप्त माहितीनुसार नंदकिशोरच्या पत्नीचे 4 वर्षांपासून सामेश्‍वर पुरणलाल पारधी (वय 39 रा. पाथरी) याच्यासोबत अनैतिक संबंध होते, असे कळले. त्यामुळे पथकाने सामेश्‍वर पारधी याला ताब्यात घेतले. विचारपूस केली असता, त्याने मृताची पत्नी योगेश्‍वरी हिच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचे सांगितले. नंदकिशोर याला या प्रकाराची माहिती झाल्याने मार्गातील अडथळा काढून टाकण्यासाठी कट रचल्याने सांगितले.

कटानुसार, 4 डिसेंबर रोजी वलनी खापरखेडा येथून नंदकिशोर व त्याची पत्नी दुचाकीने नवाटोला येथे जाण्यासाठी नागपूरमार्गे भंडारा, गोरेगाव असे जात असताना लाखनी-सालेभाट्याजवळ थांबवून आरोपी सामेश्‍वर पुरणलाल पारधी (रा. पाथरी), लेखराम ग्यानीराम टेंभरे (रा. मुंडीपार) हे दोघेही वाहनाने पोहोचले. 

अधिक माहितीसाठी - राणे दाम्पत्य आत्महत्या प्रकरणाचे गूढ उकलले : कुत्र्याचे इंजेक्शन देऊन पत्नीने केला पती, मुलांचा खून

सालेभाट्याजवळ उभे असलेल्या पतीपत्नीच्या जवळ जाऊन अंधारात नंदकिशोरच्या डोक्‍यावर सळाखीने वार केले. मृत झाल्याचे लक्षात येताच सामेश्‍वर पारधी, लेखराम टेंभरे व योगेश्‍वरी रहांगडाले यांनी नंदकिशोरचा मृतदेह पोत्यात भरला. त्यानंतर कारधा येथील वैनगंगा नदीच्या मोठ्या पुलावरून फेकून दिला. या घटनेतील तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.भंडारा पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे.  

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wife killed her husband and throw in river