‘क्रिप्टन’ रोखणार हॅकिंग

- अतुल मेहेरे
शनिवार, 28 जानेवारी 2017

आशुतोष व श्रुतीने विकसित केले सॉफ्टवेअर

नागपूर - ‘हॅकिंग’ आणि डाटा चोरीचा धोका आता टाळता येणे शक्‍य आहे. क्रिप्टन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हे शक्‍य असल्याचा दावा हे सॉफ्टवेअर विकसित करणारे आशुतोष महाजन आणि श्रुती नारनवरे यांनी केला आहे. 

आशुतोष व श्रुतीने विकसित केले सॉफ्टवेअर

नागपूर - ‘हॅकिंग’ आणि डाटा चोरीचा धोका आता टाळता येणे शक्‍य आहे. क्रिप्टन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हे शक्‍य असल्याचा दावा हे सॉफ्टवेअर विकसित करणारे आशुतोष महाजन आणि श्रुती नारनवरे यांनी केला आहे. 

तीन वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून क्रिप्टन तयार झाले आहे. त्यामुळे हॅकर्सना पकडण्याचे काम आता अधिक सोपे होणार आहे. बॅंक खात्यांतून चोरी, शाळा महाविद्यालयांमधील संगणक हॅकिंग याशिवाय घडणारे गुन्हेसुद्धा या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून रोखले जाऊ शकतात. हॅकिंगचा प्रयत्न सुरू होताच ज्या ठिकाणी सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले असेल, त्या सिस्टिमवर बीप येईल आणि हिरवा दिवा चमकेल. सिस्टिम ऑपरेट केल्यास लगेच कोण आणि कुठून हॅकिंगचा प्रयत्न करीत आहे, याची माहिती मिळेल. त्यामुळे घडणारा गुन्हा रोखता येईल, असा त्यांचा दावा आहे. 

क्रिप्टन विकसित केल्याबद्दल आशुतोषचा नुकताच एका समारंभात सत्कार करण्यात आला. विदेशातील एका सॉफ्टवेअर कंपनीचे सीईओ सॅम्युअल पालमीसानो यांनी आशुतोषला हे सॉफ्टवेअर लीजवर देण्याचा प्रस्ताव पाठवला. पण, त्याने तो नाकारला कारण त्याचदरम्यान फेसबुकच्या सीईओंनीसुद्धा सॉफ्टवेअर खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला. फेसबुक हे सॉफ्टवेअर खरेदी करून त्यांना ‘रॉयल्टी’ देणार आहे. हा प्रस्ताव आशुतोष व श्रुतीने मान्य केला आहे. लवकरच मुंबईला फेसबुकच्या सीईओंसोबत यासंदर्भात त्यांची बैठक होणार आहे.आशुतोषने पुणे व चेन्नईतून ‘सॉफ्टवेअर इंजिनिअर हॅकिंग कोर्स’ केला आहे, तर श्रुतीने हिंगणा मार्गावरील प्रियदर्शिनी महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. यापुढे याच क्षेत्रात नवनवीन संशोधन करीत राहणार आणि असेच अभिनव सॉफ्टवेअर्स विकसित करत राहणार, असा मानस या युवा अभियंत्यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.

Web Title: Krypton occur hacking