कुंभकर्णाच्या पुढ्यातच रावणाचे दहन, देशातील सर्वात मोठी कुंभकर्णाची मूर्ती मात्र दुर्लक्षित

kumbhkarn idol is in worst situation in achalpur of amravati
kumbhkarn idol is in worst situation in achalpur of amravati

अचलपूर (जि. अमरावती) : ऐतिहासिक शहर म्हणून ओळख असलेल्या अचलपूर येथे प्रसिद्ध कुंभकर्णाची निद्रिस्त अवस्थेतील सुमारे चारशे वर्षांपूर्वीची मूर्ती आजही आहे. दरवर्षी दसऱ्याला या मूर्तीला रावणदहनानंतर सोने वाहण्याची परंपरा आहे. मात्र, सध्या ही मूर्ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. याकडे लक्ष देऊन या मूर्तीचे जतन करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

अचलपुरातील बुंदेलपुरा परिसरातील कालीमाता गेटजवळील ५० फूट लांब व २० फूट रुंद असलेली भव्यदिव्य कुंभकर्णाची मूर्ती आहे. पूर्वी ही मूर्ती माती-विटांची होती. मात्र, नंतर त्याला सिमेंट-वाळूचे प्लॅस्टर चढविले गेले. ही संपूर्ण भारतातील सर्वांत मोठी कुंभकर्णाची एकमेव मूर्ती आहे. या मूर्तीला लागूनच दसरा मैदान आहे. याच मैदानावर दसऱ्याला कुंभकर्णाच्या पुढ्यातच रावणाचे दहन केले जाते. ही बहुदा भारतातील एकमेव घटना असेल. ज्याठिकाणी कुंभकर्ण झोपलेल्या अवस्थेत आहे त्याच ठिकाणी रावणाचे दहन केले जाते. 

सुमारे ४०० वर्षांपूर्वीची ही मूर्ती वारा, पाऊस, ऊन झेलत निद्रिस्त अवस्थेत आजही आहे. अचलपूरच्या या कुंभकर्णाच्या मूर्तीचा इतिहास मात्र कुणालाच माहीत नाही. दरवर्षी बुंदेलपुरा येथील रहिवासी दसऱ्याच्या दिवशी या मूर्तीची साफसफाई व डागडूजी करतात. सोबतच रावण दहन झाल्यानंतर उपस्थित सर्व नागरिक कुंभकर्णाच्या मूर्तीला सोनं वाहतात. मात्र, हे जरी खरे असले तरी सध्या ही मूर्ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. याकडे लक्ष देणे आवश्‍यक झाले आहे. अचलपूर शहराला लाभलेला वारसा जपण्यासाठी व ऐतिहासिक ओळख टिकवण्यासाठी पुरातन वास्तूचे जतन करणे गरजेचे झाले आहे. 

मूर्तीचे रहस्य गुलदस्त्यात -

बुंदेलपुरास्थित असलेली निद्रिस्त अवस्थेतील कुंभकर्णाची ही मूर्ती कोणी स्थापन केली याची माहिती या परिसरातील नागरिकांनाही नाही. ही मूर्ती कोणी व कोणत्या वर्षी स्थापन केली, याची माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे अचलपुरातील कुंभकर्णाचा इतिहास काय आहे, हे रहस्य मात्र गुलदस्त्यातच आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com