मजुराची मुलगी बनली 'पीएसआय' 

श्रीधर ढगे
रविवार, 24 जून 2018

मी लहान असल्यापासूनच आई बाबा मोलमजुरी करत आहेत. मला मुलगी आहे म्हणून त्यांनी कधी ओझं मानलं नाही. मलाही मुलगी ही ओझं नसते तर कुटुंबाचा आधार होवू शकते हे दाखवून द्यायचे होते. त्यासाठी शिक्षण हा एकमेव मार्ग होता. आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी शिकले. कोणताही कोचिंग क्लास न लावता घरीच अभ्यास केला आणि आज मला यश मिळाले, हा आनंद खूप मोठा आहे. असे मत यावेळी आरती गवई हिने सकाळकडे व्यक्त केले

खामगाव( बुलढाणा)- तालुक्यातील टेंभुर्णा गावातील आरती नागोराव गवई हीने वयाच्या २४ व्या वर्षी एमपीएससी मार्फत झालेली पीएसआय परीक्षा उत्तीर्ण केली असून, तिची महिला पोलिस उपनिरीक्षक पदावर निवड झालेली आहे. अत्यंत छोट्याश्या गावातील आणि परिस्थितीने गरीब घरातील या विद्यार्थिनीने शिक्षणात अपार कष्ट, मेहनत आणि जिद्दीने लढा देऊन तिच्या जीवनातलं सर्वात मोठं यश प्राप्त केलं आहे. तिच्या यशाचं सर्वत्र गावात कौतुक होतं आहे.

टेंभुर्णा गावातील नागोराव गवई यांची घरची परिस्थिती जेमतेम होती. त्यांच्याकडे शेती नाही, पती पत्नी मोलमजुरी करून संसार चालवितात. त्यांना आरती ही मोठी मुलगी व दोन मुले आहेत. मुलांना महागडे शिक्षण देणे त्यांना शक्य नव्हते. त्यातच मुलगी म्हणजे ओझं असं मानणाऱ्या आजच्या बुरसटलेल्या मानसिकतेत न अडकता त्यांनी मुलीला शिकविले. त्यांच्या मुलीनेही 'शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, ते पिल्यावर कोणीही गुरुगुरल्या शिवाय राहणार नाही' या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाक्याला सार्थ ठरवत जिद्द आणि चिकाटीने यश मिळवले. आरती हे कोणत्याही कोचिंग क्लास लावला माही तर शिक्षण सुद्धा जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केलं. आज ती पीएसआय पदासाठी पात्र ठरली आहे.

मुलगी बोज समजणाऱ्या समाजासाठी तीने एकप्रकारे आपल्या कृतीतून संदेश दिला आहे. आरतीच्या यशाने तिच्या परिवारा सोबतच गावाचे नाव उंचावले आहे.

मी लहान असल्यापासूनच आई बाबा मोलमजुरी करत आहेत. मला मुलगी आहे म्हणून त्यांनी कधी ओझं मानलं नाही. मलाही मुलगी ही ओझं नसते तर कुटुंबाचा आधार होवू शकते हे दाखवून द्यायचे होते. त्यासाठी शिक्षण हा एकमेव मार्ग होता. आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी शिकले. कोणताही कोचिंग क्लास न लावता घरीच अभ्यास केला आणि आज मला यश मिळाले, हा आनंद खूप मोठा आहे. असे मत यावेळी आरती गवई हिने सकाळकडे व्यक्त केले

Web Title: Labor mans daughter became 'PSI'