पुसदमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव कायम

दिनकर गुल्हाने
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

महाराष्ट्राला वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांच्या रूपाने दोन कर्तबगार मुख्यमंत्री लाभले असले तरी सतत मंत्रिपद देणाऱ्या पुसद विधानसभा मतदारसंघात पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, वाहतुकीचे रस्ते, उद्योगधंदे यासारख्या पायाभूत सुविधांचा अभाव आजही कायम आहे. माळपठार क्षेत्रात असलेल्या या मतदारसंघाच्या एका बाजूला पूस नदीवरील "वसंतसागर' व दुसऱ्या बाजूला पैनगंगा नदीवरील इसापूर धरण, अशा दोन मोठ्या जलाशयांचे पाणी डोळ्यांनी दिसत असूनही माळपठार सतत तहानलेलेच असते.

यवतमाळ : पुसद तालुक्‍यातील बराचसा भाग डोंगर-दऱ्या, नद्या-नाल्यां-ओहळांनी वेढलेला आहे. भौगोलिकदृष्ट्या माळपठार हा समुद्रसपाटीपासून उंचावर असलेला 42 गावांचा भाग नेहमीच तहानलेला असतो. माळपठाराच्या एकीकडे पुसद नदीवरील पूस प्रकल्पाचा वनवारला येथील "वसंतसागर' तर दुसऱ्या बाजूने पैनगंगा नदीवरील इसापूर धरणाचा प्रचंड जलाशय. दोन्ही बाजूला डोळ्याने पाणी दिसत असताना तहानलेल्या माळपठाराच्या डोळ्यांत नेहमीच पाणी असते. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या पुढाकारातून माळपठाराची तहान भागविण्यासाठी 42 गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली. मात्र, ही योजना अलीकडे नियमित पाणीपुरवठा करण्यास असमर्थ ठरली आहे. या योजनेतील विद्युत पंप, पाइपलाइन दीर्घ कालावधीत जीर्ण झाली आहे. या योजनेच्या पुनरुज्जीवनाची गरज असताना शासकीय यंत्रणेच्या तत्परतेअभावी माळपठार प्रादेशिक पाणीपुरवठा योजना विस्कळीत झाली आहे. तसेच हर्शी आणि नऊ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आली. मात्र, योजनेचे घोडे अडले असून नागरिकांना या योजनेतून पिण्याचे पाणी मिळाले नाही. योजना कार्यान्वित न होताच बंद पडली आहे. गावोगावी पाणीपुरवठा योजनांचे त्रांगडे झाल्याने उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या दरवर्षी भीषण झालेली पाहावयास मिळते.
तालुक्‍याला उत्तम आरोग्यसेवा पुरविण्यासाठी पुसद येथे उपजिल्हा रुग्णालय कार्यरत आहे. मात्र, या रुग्णालयासाठी 100 खाटांची प्रशासकीय मान्यता प्राप्त होऊनही या प्रश्‍नांचे भिजत घोंगडे पडले आहे. पुसद विभागाला राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि भाजप या तिन्ही पक्षांचे आमदार मिळाले असतानाही आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. तालुक्‍यातील सात प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत, त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना उपचारासाठी शहरातील महागड्या खासगी वैद्यकीय सेवांकडे नाइलाजाने जावे लागते.
पुसदचा भाग आडवळणाचा. येथे रेल्वेची सुविधा नाही. वाहतुकीसाठी रस्ते हाडे खिळखिळी करणारे आहेत. सुधाकरराव नाईक यांच्या काळातच उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीची स्थापना करण्यात आली. परंतु, पुरेशा सोयींअभावी एमआयडीसीमध्ये उद्योगधंदे वाढीस लागले नाही. शिवाय बाहेरील मोठ्या उद्योगधंद्यांना पुसदला आणण्यात लोकप्रतिनिधींना अपयश आले. त्यामुळे उद्योगधंद्यांना चालना मिळाली नाही. हातांना काम नसल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. या भागातील साखर कारखाने, सूतगिरणी, सहकारी उद्योगधंदे मोडकळीस आल्याने अनेक कुटुंबे विस्थापित झाली आहेत. रोजगाराची संधी नसल्याने या भागातील मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात पुणे मुंबईसारख्या मोठ्या शहरात स्थलांतरित होतो. रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबविण्याचा प्रयत्न मात्र होताना दिसत नाही.

जिल्हा झाल्यास विकासाला चालना
पुसद हे जिल्ह्याच्या ठिकाणासाठीचे सर्व निकष पूर्ण करत असताना पुसद जिल्हा नवनिर्मितीचा प्रश्‍न रेंगाळत पडला आहे. जिल्हानिर्मिती झाल्यास पुसदच्या विकासाला चालना निश्‍चित मिळू शकेल. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे आवश्‍यक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lack of infrastructure continues in Pusad