
लाहेरी हे आजूबाजूच्या दुर्गम भागात वस्तीस असलेल्या गावांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. येथे पहिली ते बारावीपर्यंत निवासी आश्रमशाळा, स्वस्त धान्य दुकान, तलाठी मुख्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, बस स्टॉप आणि छोट्या मोठ्या किराणा व जीवनोपयोगी वस्तू मिळण्याचे एकमेव ठिकाण आहे.
भामरागड (जि. गडचिरोली) : अतिदुर्गम अशा लाहेरी परिसरातील नागरिक तब्बल 30 ते 40 किमी अंतर पायी पार करून येथे बॅंकेच्या कामासाठी येत असतात. पण, त्यांचा मुक्काम पडला की, जेवणाची अडचण निर्माण होते. मात्र, त्यांच्या या अडचणीलाही लाहेरी पोलिस ठाण्याने दूर करत त्यांना अन्नासाठी शिधा देण्यासोबतच त्यांची दुसऱ्या दिवशीच्या न्याहारीची व्यवस्था केली.
लाहेरी हे आजूबाजूच्या दुर्गम भागात वस्तीस असलेल्या गावांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. येथे पहिली ते बारावीपर्यंत निवासी आश्रमशाळा, स्वस्त धान्य दुकान, तलाठी मुख्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, बस स्टॉप आणि छोट्या मोठ्या किराणा व जीवनोपयोगी वस्तू मिळण्याचे एकमेव ठिकाण आहे. त्यातच लाहेरी पोलिसांच्या पाठपुराव्याने महाराष्ट्र बॅंकेची अल्ट्रा स्मॉल ब्रॅंच काही दिवसांपूर्वीचे सुरू झाली आहे. त्यामुळे विविध कामांसाठी दूरवरून अगदी 30 ते 40 किमीची पायपीट करत नागरिक समूहाने येतात.
जाणून घ्या - हृदयद्रावक! बेपत्ता सव्वा महिन्याच्या बाळाचा मृतदेहच घरच्या विहिरीत तरंगताना आढळला
मुक्काम करण्यासाठी ते आपापसांत छोटे गट बनवून येथील ओळखीच्या आपल्या गरीब बांधवांकडे मुक्काम करतात. परंतु येथेच सर्व थांबत नाही. पुढचा प्रश्न असतो तो जेवणाचा. आधीच हलाखीचे जीवन जगत असलेले लाहेरीचे आदिवासी बांधव तीव्र इच्छा असतानाही जेवणाची सोय करू शकत नाहीत. अशावेळी हक्काचा एकच पर्याय उरतो तो म्हणजे उप पोलिस स्टेशन लाहेरी.
29 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता लाहेरीपासून 25 किमी दूर असलेल्या फोदेवाडा येथून सुमारे 60 नागरिक, ज्यात महिला, पुरुष आबालवृद्ध सर्व होते. त्यातच वयाची 50 ओलांडलेल्या माली घासी उसेंडीदेखील होत्या. हे सगळे पायी चालत लाहेरीत आले. दिवसभरात कामे उरकून घेतली. संध्याकाळी 6 वाजले. जेवणाची सोय नसल्याने सर्वांनी लाहेरी उप पोलिस ठाणे गाठले. सर्वांना पुरेल इतका शिधा पोलिस ठाण्याकडून पुरवण्यात आला व दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वांना नाश्त्यासाठी निमंत्रणही मिळाले.
दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता सगळे आले. यंदाची दिवाळी आदिवासी बांधवासोबत या संकल्पनेनुसार या सर्वांना कपड्यांचे वाटप करून नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. त्याचबरोबर परतताना जेवणाची सोय म्हणून शिधादेखील पुरवण्यात आला.
यावेळी प्रभारी अधिकारी अविनाश नळेगावकर यांनी भेट दिलेल्या नागरिकांचे आभार व्यक्त मानले. या उपक्रमासाठी पोलिस हवालदार तुकाराम हिचामी, अरुण टेकाम, शालू नामेवार, वर्षा डांगे, फिरोज गाठले, अरुणा आत्राम, संदीप आत्राम, डेव्हिड चौधरी, प्रेमीला तुलावी, शोभा गोदारी, सोनाली नैताम, रत्नमाला जुमनाके, सुजाता जुमनाके, योगिता हिचामी, कल्पना भिसे, वैशाली चव्हाण, मोहिन मानकर, चिरंजीव दुर्गे, नितीन जुवारे, नितीन कुमरे, सौरभ बालबुद्धे, ईश्वरलाल नैताम, अमित कुलेटी, अभिषेक पिपरे, पुरुषोत्तम कुमरे आदींनी सहकार्य केले.
इदु मंदाना जागा...
लाहेरी पोलिसांच्या या मदतीने हे सगळेच आदिवासी बांधव भारावून गेले. आपल्या वेदनांवर हळूवार फुंकर घालणाऱ्या या पोलिस बांधवांना बघून माली घासी उसेंडी यांच्या ओठांवर " लाहेरी पोलिस स्टेशन मावा इदु मंदाना जागा" अर्थात लाहेरी पोलिस ठाणे आमचे हक्काचे आश्रयस्थान आहे, हे माडिया भाषेतील हे वाक्य आले.
संपादन - अथर्व महांकाळ