महाशिवरात्रीला मार्कंड्याच्या कळसावर दिवा लावण्याचा सन्मान म्हशाखेत्री कुटुंबाला

निलेश झाडे/सूधाकर दूधे
Thursday, 13 February 2020

गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा मंदीर विदर्भातील काशी म्हणून ओळखले जाते. महाशिवरात्रीला लाखो भाविक येथे दर्शनाला येत असतात. सुंदर शिल्पांनी अलंकृत असलेले हे मंदीर अनेकांना आकर्षित करते. महाशिवरात्रीच्या दिवशी मंदीराच्या कळसावर मोठा दिवा पेटविला जातो. हा दिवा लावण्याचे धार्मिक कार्य व्याहाळ बुज येथील बारावी पिढी पार पाडीत आहे.

सावली : महाशिवरात्रीला मार्कंडा मंदीराच्या कळसावर दिवा लावला जातो. या दिव्याच्या प्रकाशात मंदीर उजळून निघत असते. चंद्रपूर जिल्ह्यातील व्याहाळ बुज येथील म्हशाखेत्री कुटूंबाची बारावी पिढी दिवा लावण्याचे धार्मिक कार्य पार पाडीत आहे. मंदीराच्या निर्मितीपासूनच दिवा लावित असल्याचे ते सांगतात. मात्र या परंपरेची सुरवात कशी झाली हे खुद्द म्हशाखेत्री कुटूंबालाही माहिती नाही.

सविस्तर वाचा - आरोपी विकेश म्हणाला, मला गोळ्या झाडून मारा...

गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा मंदीर विदर्भातील काशी म्हणून ओळखले जाते. महाशिवरात्रीला लाखो भाविक येथे दर्शनाला येत असतात. सुंदर शिल्पांनी अलंकृत असलेले हे मंदीर अनेकांना आकर्षित करते. महाशिवरात्रीच्या दिवशी मंदीराच्या कळसावर मोठा दिवा पेटविला जातो. हा दिवा लावण्याचे धार्मिक कार्य व्याहाळ बुज येथील बारावी पिढी पार पाडीत आहे. सावली तालुक्‍यातीत येणारे व्याहाळ बुज येथील राजू सखाराम म्हशाखेत्री महाशिवरात्रीला मंदीराच्या कळसावर दिवा लावतात. कार्तिक पौर्णिमेला सव्वा पायली तुपाचा तर महाशिवरात्रीला सव्वा पायली तेलाचा दिवा पेटविला जातो. दिव्यासाठी मातीच्या नविन मडक्‍याचा वापर केला जातो. दिवा लावण्याचे धार्मिक कार्य पार पाडणारी म्हशाखेत्री कुटूंबाची ही बारावी पिढी. मंदीराच्या निर्मितीपासूनच दिवा लावण्याचे कार्य पुर्वज करीत असल्याचे राजू म्हशाखेत्री यांनी सांगितले. अनेक पिढ्यांनी जोपासलेली ही परंपरा वडील सखाराम,आजोबा लक्ष्मण ,पणजोबा गंगाराम यांनी कायम ठेवली. आज राजू आणि त्यांचा पत्नी उषा दिवा लावण्याचे धार्मिक कार्य पार पाडीत आहेत. विशेष म्हणजे गावात होणाऱ्या उत्सवांची पुजा म्हशाखेत्री यांच्या हस्ते पार पाडली जाते. नुकतेच गावकर्ऱ्यांनी शाल,श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला.

मंदीर उजळणाऱ्या घरात अंधार...!

मार्कंडा मंदीर उजळून टाकणाऱ्या राजू म्हशाखेत्री यांच्या घरात मात्र अंधार आहे. कुटुंबाचे उदर्निर्वाहाचे साधन केवळ एक एकर जमीन आहे. शेती आणि मजूरी हेच उत्पनाचे साधन. पडक्‍या घरात म्हशाखेत्री यांचे कुटुंब वास्तव्य करीत आहे.

माझा वंश ही परंपरा कायम ठेवील..

माझ्या पुर्वजापासून चालत आलेली परंपरा आम्ही कायम ठेवली आहे. माझ्या नंतर माझा मुलगा, नातू ही परंपरा कायम ठेवतील असे राजू म्हशाखेत्री म्हणाले. तर पत्नी उषा म्हणाल्या मी म्हशाखेत्री परिवाराची सून म्हणून आली अन मला हे पवित्र कार्य पार पाडण्याची संधी लाभली.

दिव्याची आख्यायिका

मंदीरावर लावण्यात येणाऱ्या दिव्याची एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. महाशिवरात्रीला मार्कंडा मंदीरावर लावलेल्या दिव्याचा प्रकाश रामटेक येथील मंदीरावर पडतो. ही आख्यायिका मार्कंडा येथील माजी सरपंच नानाजी जुनघरे यांनी सांगितली.  

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lamp on acme on Markanda Temple by Mhashakhetri family on every Mahashivratrie